निकालाने काँग्रेसमध्ये ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:09 PM2018-12-11T22:09:19+5:302018-12-11T22:09:47+5:30
पाच राज्यांच्या निकालात भाजपाची वाताहत होऊन काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. या निकालाचा जल्लोष यवतमाळ शहरातील दत्त चौकासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाच राज्यांच्या निकालात भाजपाची वाताहत होऊन काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. या निकालाचा जल्लोष यवतमाळ शहरातील दत्त चौकासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला.
केंद्रात मोदीने आपल्या लाटेच्या भरवश्यावर एक हाती सत्ता मिळविल्यानंतर काँग्रेस जणू कोमात गेल्याचे चित्र होते. परंतु नोटाबंदीपासून भाजपाविरोधात वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. जीएसटीमुळे त्यात आणखी भर पडली. तेथून भाजपाविरोधात सुरू झालेली ही नाराजी दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. अलिकडे तर शेतकरीच नव्हे तर शेतमजूर, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार, तरुणाई असे सर्वच घटक भाजपावर चिडलेले आहेत. स्थानिक पातळीवरील विविध स्तरावरच्या निवडणुकांमध्ये ही नाराजी उघड झाली. तीच नाराजी पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमधूनही पहायला मिळाली आहे. भाजपाबाबत समाजातील कोणताच घटक खूश नसल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही खासगीत पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात नाराजी व्यक्त करताना दिसतात. भाजपात उघड नाराजी व्यक्त करण्याची सोय नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी कार्यकर्त्यांची स्थिती आहे. अशीच स्थिती व्यापारी-व्यावसायिकांची आहे. इन्स्पेक्टर राजची कारवाई होण्याच्या भीतीने व्यापारी कुठेच भाजपाविरोधात उघड प्रतिक्रिया देताना दिसत नाही. मात्र आम्ही बोलत नाही, पण करून दाखवू असा गर्भित इशारा व्यापारी वर्ग खासगीत देताना दिसतो आहे. व्यापाऱ्यांचा हा इशारा भाजपासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने धोक्याचा ठरतो आहे.
एकीकडे भाजपाविरोधात नाराजी वाढत असताना ‘काँग्रेसचेच सरकार बरे होते’ असा सूरही समाजाच्या विविध घटकांमधून ऐकायला मिळतो आहे. ‘सत्ता काँग्रेस वाल्यांनीच करावी’ अशाही प्रतिक्रिया आहेत. पाच राज्यांच्या निकालांनी ही बाब अधोरेखीत केली आहे. जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने झुकतो आहे. पाच राज्यांच्या निकालाने जिल्ह्यात काँग्रेसच्या गोटात प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. या निकालामुळे आगामी निवडणुका काँग्रेस जिंकेल असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे. काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जणू ऊर्जा निर्माण झाली आहे. पुढच्या निवडणुका आपल्याच म्हणून कार्यकर्त्यांचा जोश पहायला मिळतो आहे. नोटाबंदी, जीएसटीत होरपळून निघालेल्या सामान्य नागरिकांनाही या निकालाने दिलासा मिळाला आहे. भाजपा व मोदींचे सरकार चार महिन्यांनी जाणारच असा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. मात्र भाजपाला अजूनही कट्टरवाद्यांची तेवढीच साथ कायम आहे. त्या बळावरच भाजपाचे जे काय अस्तित्व असेल तेवढेच शिल्लक असल्याचे पहायला मिळू शकते.
इच्छुकांच्या गर्दीचा सूर बदलणार
मोदी लाटेमुळे गेली काही वर्ष भाजपाकडे विविध निवडणुकांसाठी उमेदवारी मागणाºयांची रीघ लागत होती. परंतु पाच राज्यांच्या निकालाची आकडेवारी पाहिल्यानंतर भाजपातील लाट ओसरत असल्याचे स्पष्ट झाले. तीन राज्ये भाजपाच्या हातून गेली. एकूणच भाजपाला उतरती कळा लागल्याचे हे संकेत असल्याचे मानले जाते. त्यामुळे लगतच्या भविष्यात येणाºया निवडणुकांमध्ये आतापर्यंत भाजपाकडे दिसणारा इच्छुकांचा गर्दीचा सूर आता काँग्रेसकडे पहायला मिळेल, असा राजकीय अंदाज आहे. लोकसभा व विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक काँग्रेसकडे अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेत नसूनही आधीच उमेदवारीसाठी गर्दी असलेल्या काँग्रेसकडे आणखी गर्दी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे.