राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा : काँग्रेसचे गजानन कांबळे दावेदार संजय भगत महागाव महागाव पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या असल्या तरी त्यांच्याजवळ सभापतीपदाचा उमेदवार नसल्याने काँग्रेसचा गुंज गणातून निवडून आलेला उमेदवार सभापतीपदी विराजमान होणार आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून पंचायत समितीत राष्ट्रवादीला पाच ठिकाणी यश मिळाले. त्या पाठोपाठ काँग्रेस तीन, शिवसेना एक, माकप १ असे संख्याबळ आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची पकड सैल झाल्याचे या निवडणुकीत दिसत आहे. मुडाणा पंचायत समितीमधून शिवसेनेचे राम तंबाखे यांनी आपले खाते उघडले. भाजपाला मात्र पंचायत समितीत एकही जागा राखता आली नाही. सर्वच ठिकाणी भाजपाला अपवाद वगळता चौथ्या नंबरसाठी ओढाताण करावी लागली. सवना पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख भरघोस मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे रामराव नरवाडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. महागाव पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गुंज हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे तेथून निवडून येणारा सदस्य सभापतीपदाचा दावेदार होणार आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसचे गजानन कांबळे विजयी झाले तर राष्ट्रवादीचे विठ्ठल कांबळे दुसऱ्या क्रमांकावर गेले. काळी दौलत पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या अनिता चव्हाण विजयी झाल्या. येथे भाजपाच्या मीना मोरे यांनी त्यांना लढत दिली. हिवरा पंचायत समितीमधून स्नेहा ठाकरे (राष्ट्रवादी) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या उज्वला भारती यांचा पराभव केला. पंचायत समिती निवडणुकीत सवना, गुंज या ठिकाणी अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती झाल्यात. साई, काळी, हिवरा, पोखरी, फुलसावंगी या पाच गणांमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकासाठी लढत दिली.
महागावात सभापती काँग्रेसचा
By admin | Published: February 25, 2017 1:06 AM