मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने थांबविली ‘संवादयात्रा’, उमरखेडमध्ये निर्णय; उपोषण सुटल्यानंतरच यात्रा जाणार पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 04:21 PM2023-09-10T16:21:34+5:302023-09-10T16:21:56+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने सुरू आहेत.

Congress stops Samvadyatra for Maratha reservation, decision in Umarkhed | मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने थांबविली ‘संवादयात्रा’, उमरखेडमध्ये निर्णय; उपोषण सुटल्यानंतरच यात्रा जाणार पुढे

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने थांबविली ‘संवादयात्रा’, उमरखेडमध्ये निर्णय; उपोषण सुटल्यानंतरच यात्रा जाणार पुढे

googlenewsNext

दत्तात्रय देशमुख

उमरखेड (यवतमाळ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने सुरू आहेत. उमरखेड येथेही बेमुदत उपोषण सुरू आहे. चक्काजाम आंदोलन, राज्य सरकारची अंत्ययात्रा अशा अभिनव पद्धतीनेही आंदोलने केली गेली. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेता काँग्रेसने उमरखेड येथे रविवारी आलेली आपली ‘संवादयात्रा’ तूर्त थांबविली.

काँग्रेस पक्षाकडून ४ सप्टेंबरपासून उमरखेड विधानक्षेत्रा अंतर्गत गावोगावी ही ‘संवादयात्रा’ काढली जात आहे. ११ सप्टेंबर रोजी ही संवादयात्रा उमरखेड शहरात आली असता येथे सुरू असलेले मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, उपोषण पाहून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल मराठा समाजाच्या उपोषणाला व आरक्षणाच्या मागणीलाकाँग्रेसतर्फे पाठिंबा देण्यात आला. पक्षाच्या वतीने महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची पिळवणूक, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आदी प्रश्नांवर तसेच केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणाच्या विरोधात लोकभावना जाणून घेण्यासाठी ‘जनसंवाद यात्रेचे’ आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले. परंतु मराठा बांधव उपोषण व विविध आंदोलनात असताना काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत उभा असून मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन संपेपर्यंत ‘जनसंवाद यात्रा’ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उमरखेड-महागाव विधानसभा संवादयात्रा समन्वयक शिवाजी देशमुख, प्रेमराव वानखेडे यांनी दिली. मराठा समाजाचे आरक्षण मार्गी लागल्यानंतर जनसंवाद यात्रा पूर्ववत सुरू करण्याचे कळविण्यात येईल, असेसुद्धा ते म्हणाले.

दरम्यान उमरखेड येथे रविवारी प्रमोद महाजन चॅरीटेबल टूस्ट, स्वातंत्र्य सैनिक बंकटलाल भुतडा बहुउद्देशिय संस्था यांच्यातर्फे दहीहांडी महोत्सव जि. प. शाळेत आयोजित आहे. या कार्यक्रमाला सैराट फेम सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरु येणार आहे. दहीहंडीत रिंकूचे नाचगाणे होईल. एकीकडे मराठा समाज बांधव उपोषण करीत असताना हा प्रकार योग्य ठरणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमात समाजबांधवांनी जाऊ नये, असे आवाहन सोशल मीडियातून केले जात आहे. मात्र भाजपचे आमदार नामदेव ससाने म्हणाले की, मराठा समाजाच्या मागणीला मी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रही पाठविले. दहीहंडी महोत्सव पूर्वनियोजित आहे. येथे नाचगाणे अजिबात होणार नाही. त्यामुळे कोणी नाराज होण्याचे कारण नाही.

Web Title: Congress stops Samvadyatra for Maratha reservation, decision in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.