'अंतर्गत सुसंवाद वाढविल्यास काँग्रेस देशात पुन्हा उसळी घेईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 01:47 PM2021-11-21T13:47:39+5:302021-11-21T13:52:44+5:30

काँग्रेस नेतृत्वानेही अंतर्गत सुसंवाद वाढवावा. असे झाल्यास काँग्रेस नव्या ताकदीने पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

Congress will re-emerge in the country if internal harmony is enhanced said sushilkumar shinde | 'अंतर्गत सुसंवाद वाढविल्यास काँग्रेस देशात पुन्हा उसळी घेईल'

'अंतर्गत सुसंवाद वाढविल्यास काँग्रेस देशात पुन्हा उसळी घेईल'

Next
ठळक मुद्देसुशीलकुमार शिंदे : विश्वास गमावल्याने विधेयक मागे घेऊनही भाजपला राजकीय फायदा नाही

विशाल सोनटक्के

यवतमाळ :काँग्रेस विचार आहे. तो संपणारा नाही. देशाच्या इतिहासानेही दोन-तीन वेळेस याची अनुभूती दिली आहे. काँग्रेस नेतृत्वाने अंतर्गत सुसंवाद वाढविल्यास येणाऱ्या दिवसांत जनतेच्या पाठबळावर काँग्रेसने केंद्रातही उसळी मारलेली दिसेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश आणि पंजाब निवडणुकांच्या भीतीमुळे भाजपने शेतकरी विधेयक मागे घेतले आहे. मात्र, जनतेने त्यांना पुरते ओळखलेले असल्याने निवडणुकांत भाजपला काहीही राजकीय फायदा मिळणार नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

शनिवारी सकाळी यवतमाळमध्ये ते खास 'लोकमत'शी बोलत होते. नोटाबंदीप्रमाणेच भाजपने रातोरात शेतकरी विधेयक आणले. यासाठी ना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले, ना लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी किमान मार्केट कमिट्यांसोबत तरी चर्चा करायला हवी होती. मात्र, कुठलीही गोष्ट रेटून नेण्याचा स्वभावधर्म असल्याने विरोध असतानाही विधेयकावर ते अडून बसले. आता उत्तर प्रदेश आणि पंजाब निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी हे विधेयक मागे घेतले आहे. मात्र, इतिहासातील सर्वांत मोठे आणि प्रदीर्घ चाललेले आंदोलन सरकारने ज्या पद्धतीने हाताळले, ते पाहता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा त्यांच्यावर भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे विधेयक मागे घेऊनही भाजपला काही फायदा होईल, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.

पंजाबमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे. उत्तर प्रदेशातही प्रियंका गांधी यांनी सूत्र हातात घेतल्याने परिस्थिती झपाट्याने सुधारतेय. जी-२३ म्हणविल्या जाणाऱ्या काही वरिष्ठांत नाराजीचा सूर असला तरी ही सर्व मंडळी समंजस आहेत. गुलामनबी आझादांना तर मी युवक काँग्रेसमध्ये काम करतानापासून पाहतोय. इंदिरा गांधी, संजय गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलंय. ते स्पष्ट बोलतात; पण काँग्रेसपासून दूर जातील असे वाटत नाही. शेवटी भाजपच्या भस्मासुराशी लढायचे असेल तर सर्वांना एकत्र यावे लागेल. काँग्रेस नेतृत्वानेही अंतर्गत सुसंवाद वाढवावा. वैचारिक भूमिका मांडणाऱ्या कृती शिबिरांवर भर द्यावा, कार्यकर्ते एकत्र आणून विचारांचे आदान-प्रदान करावे. आजपर्यंत अशा प्रक्रियेतूनच पक्षात सामुदायिक नेतृत्व उभं राहत आलं आहे. नाराज असले तरी जे खरे काँग्रेसवाले आहेत, ते कुठे गेलेले नाहीत. त्यांना वाटतं आपण आयसोलेट झालोत का, तर ते झालेले नाहीत. मात्र, नेतृत्वाला त्यांना एकत्रित आणावं लागेल. असे झाल्यास काँग्रेस नव्या ताकदीने पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंकडून देशाच्या गरजेचं राजकारण

भाजपचे सूडाचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. जनता पार्टीवेळी त्यांनी भरमसाट नावे बदलली; पण ती लोकांनी स्वीकारली नाहीत. तेच आज भाजप करीत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रम घेऊन कार्यरत आहे. आघाडीचे कुठलेही सरकार चालविणे तशी तारेवरची कसरत असते. मात्र, उद्धव ठाकरेंचे कौतुक करायला हवे. त्यांच्या पक्षाची विचारधारा कट्टरतेकडे झुकणारी असली तरी सध्या ते देशाला जे गरजेचं आहे, नेमकं तेच करत असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

देशाच्या सीमा असुरक्षित, परराष्ट्र धोरण बिघडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातल्या मोठ्या नेत्यांना मिठ्या मारण्यात दंग आहेत; पण आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे? शेजारचे सार्क देश नेपाळ, भूतान, श्रीलंका सोडा, आपण अरुणाचल प्रदेशची बॉर्डर तरी नीट सांभाळत आहोत का, असा प्रश्न करीत केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे बिघडल्याची टीका शिंदे यांनी केली. सीमेमध्ये येऊन बांधकाम होत असताना हे झोपा काढत होते का, आम्ही बांधलेल्या टनेलचे यांनी उद्घाटन केले. त्याचा बडेजावपणा मिरविला. तिकडे कुठलीही प्रतिक्रिया न देता चीन कुरघोडी करतेय, या घडामोडी कशाचे द्योतक आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Congress will re-emerge in the country if internal harmony is enhanced said sushilkumar shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.