‘माझी झाली नाही कर्जमाफी’ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विविध सामाजिक संघटना १४ जुलै रोजी शवयात्रा काढत असतानाच आता काँग्रसेनेही १२ जुलै रोजी प्रत्येक तालुका स्तरावर आंदोलनाची घोषणा केली आहे. ‘माझी झाली नाही कर्जमाफी’ असे लिहून घेऊन शेतकऱ्यांचे स्वाक्षरी अभियान राबविले जाणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी या आंदोलनाबाबत कळविले आहे. हे आंदोलन २० जुलै २०१७ पर्यंत चालणार आहे. भाजपा व शिवसेना युती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या फसवणुकीविरोधात जनजागृती करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन होणार आहे. आंदोलनाच्या या काळात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही अशा शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. ‘माझी झाली नाही कर्जमाफी’ या शिर्षकाखाली त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार असल्याचे डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. काँग्रेसच्या या आंदोलनात जिल्हाभरातील पक्षाचे तमाम पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकरी-शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे.
काँग्रेसचे जिल्हाभर स्वाक्षरी अभियान
By admin | Published: July 13, 2017 12:12 AM