आर्णी-केळापूर : पालकमंत्र्यांच्या भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी यवतमाळ : महसूल राज्यमंत्र्यांना धडा शिकविण्याच्या नादात पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचा लालदिवा चक्क भाजपा आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या हाती दिल्याने आमदार समर्थकांमध्ये पालकमंत्र्यांविरुद्ध तीव्र रोष पहायला मिळतो आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड आणि भाजपाचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार यांच्यात राजकीय वर्चस्वाचा वाद सुरू आहे. सेनेने भाजपाविरोधात उघड भूमिका घेतली. म्हणून भाजपानेही सेनेला धडा शिकविण्याचा चंग बांधला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाला धडा शिकविण्याची आयतीच संधी चालून आली. सर्वाधिक २० जागा असल्याने राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करण्याचे शिवसेनेचे नियोजन होते. तशी घोषणाही पत्रपरिषदेत झाली. परंतु राष्ट्रवादीतील कनिष्ठापुढे ज्येष्ठाचे वजन कमी पडल्याने त्यांना झुकावे लागले. पर्यायाने घोषणा करुनही त्या भूमिकेपासून फारकत घेत सेनेला पाठिंबा देण्याची वेळ राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यावर आली. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणे हे एकमेव ध्येय भाजपाने ठेवले होते. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, अशी पालकमंत्र्यांची भूमिका होती आणि या भूमिकेनुसार त्यांनी कृतीही केली. अवघे ११ सदस्य असताना काँग्रेसला अध्यक्षपद देऊन जिल्हा परिषदेचा लालदिवा त्यांच्या हवाली केला. ही तडजोड करताना या लालदिव्याचा प्रकाश भाजपाच्याच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसला उजाळून काढेल याचा साधा विचारही केला गेला नाही. जणू भाजपा आमदारांच्या विरोधात काँग्रेसला ताकद देण्याचाच हा प्रकार होता. अनपेक्षितरीत्या काँग्रेसला लालदिवा मिळाल्याने आणि त्याचा प्रकाश भाजपाला मायनस करणारा ठरणार असल्याने आर्णी-केळापूरचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांचे समर्थक संतप्त झाले आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी भाजपाच्या हातातील विधानसभा मतदारसंघ कशाला दावावर लावला असा सवाल तोडसाम समर्थक विचारत आहेत. आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नवखे तरुण प्रा. राजू तोडसाम यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, ज्येष्ठ माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र आता भाजपाच्या पालकमंत्र्यांनीच मोघेंना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा लालदिवा आयताच उपलब्ध करून दिला आहे. याच दिव्याच्या बळावर अॅड. मोघे आता आर्णी-केळापूर मतदारसंघात काँग्रेसची जोरदार बांधणी करणार आहे. या दिव्याचा पक्षबांधणी व पुढील विधानसभेसाठी शक्य तेवढा उपयोग मोघेंकडून करुन घेतला जाणार आहे, यात शंका नाही. त्यामुळेच आमदार तोडसाम समर्थकांमध्ये आतापासूनच हूरहूर पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) माझ्या मतदारसंघात काँग्रेसने लालदिवा आणला याबाबत मी फार काही बोलू शकणार नाही. मदन येरावार आमचे नेते आहे. त्यांना व भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना भविष्यात वेगळी भूमिका सिद्ध करायची असेल, त्याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेला असण्याची शक्यता आहे. - प्रा. राजू तोडसामआमदार, आर्णी-केळापूर. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या लालदिव्याचे भाजपाला फार काही नुकसान होणार नाही, कारण भाजपाकडे पाच आमदार आहेत. त्या माध्यमातून गावखेड्यापर्यंत विकास पोहोचविला जाईल. सध्या सत्तेचे समीकरण व विकास महत्वाचा आहे. पक्षीय राजकारणाचा विचार निवडणुकीच्या वेळी केला जाईल.- राजेंद्र डांगेजिल्हाध्यक्ष, भाजपा
भाजपाच्या मतदारसंघात काँग्रेसचा लालदिवा
By admin | Published: March 24, 2017 2:06 AM