जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेसचे मनिष पाटील
By विशाल सोनटक्के | Published: September 25, 2023 03:25 PM2023-09-25T15:25:42+5:302023-09-25T15:26:20+5:30
महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे महायुतीचा दारूण पराभव
यवतमाळ : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार मनिष पाटील यांना १५, तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राजुदास जाधव यांना अवघी सहा मते मिळाली. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीने जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत असल्याचा संदेश दिला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्याने अध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. २१ सदस्यीय जिल्हा बँकेत काँग्रेसकडे सर्वाधिक नऊ संचालक आहेत. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीन, तर शिंदे गट, शरद पवार गट आणि अजित पवार गटासह अपक्ष म्हणून प्रत्येकी दोन संचालक आहेत.
भाजपकडे अवघा एक संचालक असतानाही पक्षाने या निवडणुकीत अध्यक्षपदी महायुतीचा उमेदवार बसविण्याचा चंग बांधला होता. यासाठी पालकमंत्री संजय राठोड, भाजप आमदार मदन येरावार आणि राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तगडी फिल्डिंग लावली होती. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही संचालक फुटण्याची भीती असल्याने मोठी दक्षता घेतली जात होती. अखेर सोमवारी गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये काँग्रेसचे मनिष पाटील १५ मते घेवून विजयी झाले. तर महायुतीच्या राजुदास जाधव यांना अवघी सहा मते मिळाली.