यवतमाळ - ट्रक चालक व वाहकाचा खून करून त्यातील लाखोंचा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे यवतमाळ जिल्हा कनेक्शन पोलीस तपासात पुढे आले आहे. या टोळीचे दोन सदस्य पुसद तालुक्यातील असून एकाला पोलिसांनी रविवारी अटक केली.
जितेंद्र उर्फ पिंटू किसन राठोड (४७) रा. कोपरा ह.मु. ग्रीन पार्क पुसद जि. यवतमाळ असे या आरोपीचे नाव आहे. त्याचा पुसदमधील साथीदार तुकाराम रामचंद्र राठोड याला यापूर्वीच मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. जितेंद्र उर्फ पिंटू हा सहा राज्यातील गुन्ह्यात सहभागी आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, तामिलनाडू आदी तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रक चालक व वाहकाचा खून करणे, त्यांच्या अंगावरील कपडे काढून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर अथवा जंगलात फेकणे, ट्रक व त्यातील माल लुटून नेणे, अशा स्वरूपाचे तब्बल २२ गुन्हे अलिकडच्या काळात दाखल आहेत. पुणे येथून निघालेला ट्रक मालासह गायब झाल्याचे प्रकरण नुकतेच मध्य प्रदेशातील मिसरोट पोलीस ठाण्यात नोंदविले गेले. लुटारूंच्या या टोळीचा प्रमुख आदेश गुलाबसिंग खांम्बरा रा. खिरीया मोहल्ला, मंडीदीप भोपाळ मध्यप्रदेश हा आहे. गुलाबसिंगसह त्याच्या टोळीतील सदस्य जयकरण प्रजापती रा. बारीगड जि. भोपाळ, तुकाराम रामचंद्र राठोड रा. कोपरा ता. पुसद जि. यवतमाळ या तिघांना अटक केली गेली. त्यांचा एक साथीदार जितेंद्र आपल्या गावाकडे (कोपरा ता. पुसद) येथे दडून असल्याची टीप मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी यवतमाळ एसपींना दिली. त्या आधारे यवतमाळ एलसीबीने जितेंद्रला रविवारी अटक केली. त्याला मिसराट पोलीस ठाण्याचे (भोपाळ) निरीक्षक संजीव चौकसे यांच्या ताब्यात देण्यात आले.
पुसदचे दोघेही अट्टल गुन्हेगारलुटारूंच्या आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असलेले पुसद तालुक्यातील जितेंद्र व तुकाराम हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुसद शहर, वाशिम, जळगाव, औरंगाबाद येथे चोरीच्या ट्रकचे इंजीन नंबर व चेचीस नंबर बदलवून ट्रक विकल्याचे गुन्हे दाखल आहेत.
नागपूर कारागृहात आला संपर्कजितेंद्र व तुकाराम २००९-१० मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांची ट्रक चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या आदेश खांम्बरा याच्याशी ओळख झाली. कारागृहातून सुटताच हे दोघेही त्या टोळीत सहभागी झाले.
मोडस आॅप्रेन्डी : आधी पार्टी, नंतर लूटखांम्बरा टोळीने ट्रक लुटण्यासाठी गुन्ह्याची विशिष्ट पद्धत विकसित केली. या टोळीचे सदस्य वेगवेगळ्या मोठ्या ढाब्यांवर कोणत्याही ट्रक चालकाला तुझा माल विकून देतो असे आमिष द्यायचे, त्याला जेवणाची पार्टी द्यायचे, या दरम्यान ते जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायचे. चालक-वाहक झोपी जाताच त्यांना ट्रकसह जंगलात नेले जात होते. तेथे त्यांचा खून करून व प्रेताची विल्हेवाट लावून ट्रक पळवून नेला जात होता. या टोळीची ही गुन्ह्याची पद्धत (मोडस आॅप्रेन्डी) मध्यप्रदेश पोलिसांनी कथन केली.