यवतमाळ : यवतमाळ-अमरावती या जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाची लवकरच थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या दोन्ही जिल्ह्यांना समृद्धीशी जोडण्यासाठी सुमारे ८४ किमीच्या प्रमुख राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सविस्तर नकाशे व अंदाजपत्रक (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना लवकरच सुपरफास्ट वाहतुकीसाठीचा महामार्ग मोकळा होईल. याबरोबरच शेतमालाच्या वाहतुकीलाही गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांनाही नवसंजीवनी मिळेल.
महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे नुकतेच लोकार्पण झाले. दहा जिल्ह्यांतील २६ तालुक्यांमधील ३९१ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. महामार्गामुळे आर्थिक गतिविधी वाढून या भागात रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा मागास जिल्ह्यांना व्हावा यासाठी विदर्भातील यवतमाळसह इतर जिल्हे समृद्धीशी जोडण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती.
या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करणार असल्याची घोषणा केली होती. तसे झाल्यास नागपूर ते गोंदिया अंतर केवळ एक तासावर येणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येईल. त्याचा मोठा फायदा धान उत्पादक व निर्यातदार शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा आहे.
त्यातच आता समृद्धी महामार्गाची यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांना थेट कनेक्टिव्हिटी देण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख राज्य मार्ग क्र. १४ बामणी, बल्लापूर-चंद्रपूर-यवतमाळ-नेर-बडनेरा या रस्त्यावरील यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा ते अमरावती जिल्ह्यातील बडनेरा हा राज्य मार्ग दर्जाचा रस्ता समृद्धी महामार्गास इंटरचेंज जवळ छेदून जातो. सदर इंटरचेंजपासून यवतमाळपर्यंतची लांबी सुमारे ४७.९० किमी तर बडनेरापर्यंतची लांबी ३६.४० किमी आहे. या ८४.३० किमीच्या प्रमुख राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून तो मार्ग थेट समृद्धीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना लवकरच समृद्धीची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांची नुकतीच नागपूर येथे बैठक झाली. त्यानुसार प्रमुख राज्य मार्गावरील ८४.३० किमीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. या अनुषंगाने महामंडळाअंतर्गत सदर कामाचे सविस्तर नकाशे व अंदाजपत्रक (डीपीआर) तयार करण्यात येतील. सदर लांबीच्या रस्ता सुधारणेचे काम या पूर्वीच्या एखाद्या योजनेतून मंजूर आहे का, याची सविस्तर माहिती दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंत्यांकडून मागविली आहे.
- संगीता जयस्वाल, प्रकल्प संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळ
समृद्धी महामार्गामुळे विदर्भाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे. या महामार्गाचा विदर्भातील मागास जिल्ह्यांना लाभ मिळायला हवा, अशी माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. हा महामार्ग पुढे गोंदिया-गडचिरोलीपर्यंत न्यावा आणि यवतमाळला महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच मी सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. यवतमाळ-अमरावती जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आता चौपदरीकरणाचे काम होणार आहे. या निर्णयाचा फायदा या दोन्ही जिल्ह्यांतील शेतमालासह इतर उद्योग व्यवसायांनाही होईल. या कामाच्या पूर्णत्वासाठीही मी व्यक्तीश: पाठपुरावा करेन.
- विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य