हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कनगर बांधकाम करायचे म्हटले की, पनवानगी मिळविण्याची मोठीच झंझट असते. सतराशे छप्पन कागदपत्रे जमा करता-करता नाकीनऊ येतात. पण आता नागरिकांची ही ससेहोलपट थांबणार आहे. कारण आर्णी नगरपरिषदेने बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रियाच आॅनलाईन केली आहे. परवानगीसाठी नगरपरिषदेत चकरा मारण्यापेक्षा आता फक्त आॅनलाईन प्रस्ताव सादर केला की बस्स!विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाने याबाबत २४ जानेवारीलाच निर्णय घेतला आहे. परंतु, सर्वप्रथम आर्णी नगरपरिषदेने या निर्णयाची शुक्रवारपासून प्रत्यक्ष अमलबजावणीही सुरू केली आहे. आर्णीत शुक्रवारी मिळालेली ही आॅनलाईन परवानगी जिल्ह्यातील पहिलीच परवानगी आहे, हे विशेष.अशी परवानगी मिळविण्यासाठी नागरिकांनी परवानाधारक अभियंत्याकडून प्रस्ताव दाखल करायचा आहे. त्यानंतर नगरपरिषदेचे अभियंता सदर जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर इतर सोपस्कार त्वरित पार पाडताच बांधकामाची परवानगी मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी आर्णी नगरपरिषदेने पाच अभियंता तसेच तीन आर्किटेक्ट यांचे पॅनल नेमले आहे. त्यांच्याकडून हे प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. आॅनलाईन प्रणालीमुळे सर्वसामान्य जनतेचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.जयंत वसंत निळे हे आॅनलाईन प्रस्ताव दाखल करुन परवानगी घेणारे पहिलेच लाभार्थी ठरले आहे. यापुढे आॅफलाईन परवानगी दिली जाणार नसून हळूहळू पूर्ण परवानग्या आॅनलाईनच होणार आहे.यासाठी बांधकाम अभियंता लिना इंगोले, संगणक अभियंता प्राची तामगाडगे, नगरपरिषदेचे परवानाधारक अभियंता अंकुश जाधव, नीलेश चव्हाण, मंजील काटप्पलीवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस. एस. टाले यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.यापुढे आर्णीतील नागरिकांनी बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आॅनलाईन प्रणालीचाच वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा अर्चना मंगाम, बांधकाम सभापती अनवर खान पठाण यांनी केले आहे.
बांधकाम मंजुरी आॅनलाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:43 PM
नगर बांधकाम करायचे म्हटले की, पनवानगी मिळविण्याची मोठीच झंझट असते. सतराशे छप्पन कागदपत्रे जमा करता-करता नाकीनऊ येतात. पण आता नागरिकांची ही ससेहोलपट थांबणार आहे. कारण आर्णी नगरपरिषदेने बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रियाच आॅनलाईन केली आहे.
ठळक मुद्देआर्णी नगरपरिषदेचा पुढाकार : नागरिकांच्या चकरा टळणार