लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात कंत्राटदार कल्याण संघटनेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले.विदर्भातील कंत्राटदारांची सभा २२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये कंत्राटदारांच्या समस्येवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. २७ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसटीमुळे अतिरिक्त भुर्दंड बसत असल्याने कंत्राटदारांनी बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.काही कंत्राटदारांच्या मागण्या मंजूर केल्या जात आहे. निविदा भरा, मदत करतो, असे प्रलोभन काही कंत्राटदारांना दाखविले जात आहे. संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न शासनाचे प्रतिनिधी म्हणून करत असल्याचा थेट आरोप अधीक्षक अभियंत्यांवर करण्यात आला आहे. त्यामुळेच आंदोलनाचा तीव्र पवित्रा घेण्यात आला आहे.दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कंत्राटदारांची मागणी योग्य असल्याने तातडीने दखल घेऊन शासकीयस्तरावर विविध विभागात आदेश निर्गमित करण्याची कारवाई करावी, असे म्हटले आहे.
बांधकाम कंत्राटदार ठोकणार अभियंता कार्यालयाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:25 PM