रस्ते, नाल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
नाविन्यपूर्ण विकास निधीतून शहरात रस्ते व नाली बांधकाम करण्यात आले. परंतु त्या कामांमध्ये दर्जा नसल्यामुळे बहुतांश कामे मातीमोल झाली. स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रोड अल्पावधीत दयनीय झाला आहे. तीच अवस्था शहरातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नको त्या ठिकाणी नालीचे बांधकाम करण्यात आल्यामुळे जनतेच्या पैशांचा विनियोग विकासासाठी नव्हे, तर कोणाच्या तरी समाधानासाठी व कमिशनपोटी खर्च करण्यात आल्याचे दिसून येते.
बॉक्स
पालिकेच्या उत्पन्न वाढीकडे सर्वांचे दुर्लक्ष
नगरपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असे कोणतेही कार्य करण्यात आले नाही. उलट शहरातील कर वसुली कमालीची मंदावली आहे. उत्पन्न वाढीसाठी कोणतेही उपाय केले जात नाहीत. शहरातील नगरपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या खुल्या जागेतील अतिक्रमण कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून नियमित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बॉक्स
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे
नगरपंचायत कार्यालयासमोर पाच ते सहा फूट रुंद १०० ते २०० फूट लांब असलेली सांडपाण्याची नाली व त्यात साचलेल्या पाण्याची सुटलेली दुर्गंधी आरोग्याला घातक ठरू पाहात आहे. त्यावर नगरपंचायतीचे कोणतेही नियोजन नाही. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाचे प्रवेशद्वारच घनकचरा व्यवस्थापनाचे डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. तेथे शहरातील घनकचरा फेकला जातो. भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन्ही बँकांच्या बाजुलाच घनकचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्याची उचल होत नसल्यामुळे शहरात दुर्गंधीमुळे अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. साथीचे रोग बळावत आहेत.
बॉक्स
अतिक्रमणधारकांना रान मोकळे
तहसील कार्यालय ते भारतीय स्टेट बँक हा रस्ता अतिक्रमणधारकांनी पूर्ण गिळंकृत केला. नवीन वसाहतीत झालेल्या विकासकामांचा खेळखंडोबा करण्यात आला. रस्त्यावर टाकण्यात आलेले रपटे अतिशय धोकादायक बनले. नगरपंचायतीचा बांधकाम विभाग व शाखा अभियंता निव्वळ पांढरा हत्ती ठरले आहेत.
बॉक्स
रखडलेल्या योजना पूर्णत्त्वास नेण्यासाठी प्रयत्नच नाही
नगरपंचायत प्रशासकीय इमारतीकरिता सुरुवातीला ६० लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु योग्य नियोजनाअभावी तो प्रस्ताव रखडला आहे. पाच वर्षांत नगरपंचायत प्रशासनाने शहराच्या विकासाकरिता व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. लोंबकळत असलेल्या योजना पूर्णत्त्वाला नेण्यासाठी विशेष कार्य केलेले दिसून येत नाही.
बॉक्स
शहराला विविध समस्यांचा घेरा
शहरातील गुराढोरांचा रस्त्यावर मुक्तसंचार आहे. ही नवीनच डोकेदुखी नागरिकांना सतावू लागली आहे. आठवडी बाजारातून नगरपंचायतीला वर्षाकाठी लाखो रुपयाचे उत्पन्न मिळते. व्यापाऱ्यांना आणखी सुविधा देऊन उत्पन्न वाढविता येते. परंतु त्यातही नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसते. पाणी समस्या, रस्ते, नाली, घनकचरा व्यवस्थापन व नगरपंचायत उत्पन्न वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कर वसुली याविषयी नगरपंचायत प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.