एक कोटींचे नुकसान : आठवडीबाजारात सफरचंद, केळी, शहाळ्यांचा कोळसा लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आठवडीबाजारातील फ्रूट मंडीला लागलेल्या आगीत दहा दुकाने भस्मसात होऊन सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी पहाटे १.३० वाजता लागलेल्या या आगीत सफरचंद, केळी, डाळींब, शहाळे यासह विविध फळांचा कोळसा झाला. चार तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.येथील आठवडीबाजारालगत जुनी फ्रूट मंडी आहे. ५५ वर्ष जुन्या मंडीत अनेक ठोक फळ विक्रेत्यांची दुकाने आणि फळांची गोदामे आहेत. रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पावसाळी दिवस असतानाही या आगीने रौद्ररुप धारण केले. पाहता पाहता दहा दुकाने आगीच्या कवेत आले. ही माहिती होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. तसेच नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला सूचना देण्यात आली. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी शनिवारीच मोठ्या प्रमाणात फळे आणली होती. ती या गोदामात ठेवलेली होती. मात्र आगीत सर्व फळे भस्मसात झाली. मका, केळी, डाळींब, पपई, आंबे, सरफचंद यासह विविध फळांचा समावेश आहे. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, दुकानावरील टीनपत्रे जळाली. दुकानांचे अस्तित्वच रविवारी सकाळी दिसत नव्हते. या आगीत प्यारे मोहंमद अब्दुल रहेमान, मुश्ताक अहेमद अब्दुल रहेमान, मोहम्मद हफीज मोहम्मद साहब, मोहम्मद रशिद मोहम्मद साहब, मोहम्मद सलीम मोहम्मद बशीर, मो. अजहर मो. जाफर, मो. शाकीर मो. इकबाल जिंद्रान, सैयद मजरहोद्दीन सैयद शमशोद्दीन, ताज मोहम्मद मो.इशाक, मो.इशाक मो. हयात यांच्या दुकानांचा समावेश आहे. यवतमाळच्या इतिहासात फ्रूट मंडीला एवढी भीषण आग लागण्याची ही पहिलीच घटना असावी. या सर्व फळ व्यापाऱ्यांवर मोठे संकट कोसळले.रविवारचा बाजार प्रभावीतयवतमाळ शहरात रविवारी आठवडी बाजार भरतो. शहरात विविध ठिकाणी फळांची मोठ्ठाली दुकाने लागतात. हे सर्व विक्रेते याच मंडीतून फळे खरेदी करतात. परंतु रविवारी पहाटे लागलेल्या आगीने विक्रेत्यांना फळ खरेदी करता आले नाही. त्यामुळे रविवारच्या बाजारात फळांची काही तुरळक दुकानेच दिसत होती. या आगीमुळे फळांचा बाजार चार दिवस तरी प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात आले.
फ्रूट मंडीत दहा दुकाने भस्मसात
By admin | Published: July 17, 2017 1:33 AM