यवतमाळ : स्पर्धा परीक्षेच्या युगात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेने महादीप हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात टॉप ठरलेल्या ३७ विद्यार्थ्यांना विमानाने बंगळुरू आणि म्हैसूरचा प्रवास घडणार आहे. गुरुवारी (दि. २८) हे विद्यार्थी प्रवासाला निघणार आहेत.
जिल्हा परिषदेने महादीप हा उपक्रम पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभर राबविला होता. यामध्ये शाळास्तर, केंद्रस्तर, तालुका आणि सरते शेवटी जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एमपीएससी, यूपीएससीच्या तोडीची होती. या परीक्षेत टॉप ठरलेल्या ४२ विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास घडविला जाणार होता. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या अडचणी आल्यामुळे आता ३७ विद्यार्थी विमानाने बंगळुरू आणि म्हैसूरला जाणार आहेत.
यामध्ये चार विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. याशिवाय एका दिव्यांग विद्यार्थ्याचाही त्यात समावेश आहे. गुणवत्तेच्या निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रवास घडवून आणला जात आहे. बंगळुरूमध्ये प्राणी संग्रहालय आणि म्हैसूरमध्ये वृंदावन गार्डन यासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल घडविली जात आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी आणि मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासह स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा हा मुख्य उद्देश महादीपचा होता. यातूनच ही सहल आता राज्याबाहेर जात आहे.
२८ एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभागृहातून जिल्हाधिकारी अमोल येडगे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर प्रवासासाठी निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे. नागपूरमधून हे विद्यार्थी विमानाने थेट बंगळुरूला पोहोचणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. दोन दिवसांमध्ये विविध ठिकाणी भेटीही देणार आहेत. तर दोन दिवस म्हैसूरसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षक असणार आहेत. एका शिक्षकाकडे सहा विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्याचे पालक सोबत असणार आहेत. हा अभूतपूर्व सोहळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विमानाने प्रथमच प्रवास करणार आहेत आणि विविध ठिकाणांची माहिती घेणार आहेत.
महादीप घडविणार इतिहास
शासकीय शाळांमधील विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे पडू नये म्हणून शिक्षण विभागाने महादीप उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात सर्वाधिक टॉप गुणांकन मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विमानवारी घडणार आहे. हा जिल्हा परिषद शाळेचा इतिहास असणार आहे.
महादीप उपक्रमाला दारव्हा येथून सुरुवात झाली. या उपक्रमाला मिळणारे यश पाहता, त्याची अंमलबजावणी जिल्हाभरात केली जात आहे. यासाठी विशेष पुस्तकांची निर्मिती करण्यात आली. हे पुस्तक सर्वांसाठीच उपयोगी आहे. या परीक्षेत टॉप करणारे विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले आहेत.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.