पालकमंत्री : शहराच्या सौंदर्यीकरणात पडेल भरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्याच्या दिवसात वीज, वादळी वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो. शिवाय अपघात होण्याची शक्यतासुध्दा जास्त असले. त्यातच संपूर्ण शहरात उपरीतार विद्युत जोडण्या असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. शहराचे हे बकालपण दूर करण्यासाठी तसेच ग्राहकांना अखंड, निरंतर आणि सुरळीत सेवा देण्यासाठी भुमिगत विद्युत वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.येथील विद्युत भवन कार्यालयात पायाभूत आराखडा योजनेंतर्गत शहरातील विविध ठिकाणच्या उपरीतार मार्ग उच्चदाब व लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला शुक्रवारी प्रारंभ झाला, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन बाळासाहेब चौधरी, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड उपस्थित होते. पायाभूत सुविधांसाठी महावितरणला ८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरात हायमास्ट लाईट, एलएडी लाईटसाठी आलेला निधी गतीने खर्च झाला पाहिजे. तसेच निघालेल्या विद्युत खांबाजवळ पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी घ्यावी. कोणाचेही विस्थापन न करता पंतप्रधान आवास योजनेत त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे पालकमंत्री म्हणाले. प्रास्ताविकात अधिक्षक अभियंता माहुरे यांनी सांगितले की, राज्यात यवतमाळ ही पहिली नगर पालिका आहे, जेथे उपरी वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर होत आहे. या भूमिगत विद्युत वाहिनीसाठी १६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून कामाची निविदासुध्दा काढण्यात आली आहे. सदर काम एक वर्षात पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
भूमिगत वाहिन्यांमुळे अखंडित वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 2:24 AM