स्नेहा मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : मराठी शाळा आणि मराठी भाषा याचा व्यावहारिक पद्धतीने वापर व्हावा या विचाराने ज्ञानभाषा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष काम करत आहे. पहिल्यांदाच ज्ञानभाषा प्रतिष्ठानच्या वतीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जागर करण्यासाठी आले आहेत. संमेलननाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून स्थानिक आणि साहित्य प्रेमीमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे.हैदराबाद येथील संगणक अभियंता सुचिकांत वनारसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मोहिमेत सामील होण्यासाठी अनेक जण आवर्जून ग्रंथ प्रदर्शनातील दालनाला भेट देत आहेत. शिवाय, या मराठी विषयक मोहिमेची माहिती घेऊन त्याला पाठिंबा देत मोहिमेत सहभागी होत आहे. या प्रतिष्ठानच्यावतीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोग्य, साहित्य, निसर्ग, पर्यावरण संवर्धनाविषयी अनेक समूह कार्यरत आहेत. या समूहांच्या माध्यमातून दररोज मराठी भाषेतून त्या- त्या विषयांसंबंधी माहिती शेयर केली जाते. तसेच प्रतिष्ठानच्यावतीने गावोगावी वाचनकट्टे आयोजित केले जातात, या वाचन कट्टयांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीत मराठी भाषा आणि शाळांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात येते. तसेच त्यांनी अधिकाधिक वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.याविषयी, प्रतिष्ठानच्या सचिव मृणाल पाटोळे यांनी सांगितले की, राज्यभरात प्रतिष्ठानचे ३० हून अधिक विश्वस्त आहेत. हे सर्व विश्वस्त आपआपल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून मराठी भाषा आणि शाळा यांच्या संवर्धनासाठी प्रतिष्ठानसह काम करीत आहेत. गेल्या तीन दिवसांत ८०० हुन अधिक जणांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यात महाविद्यालयीन तरुणाईचाही लक्षणीय समावेश आहे.
ज्ञानभाषेच्या जागरासाठी संमेलनाची वारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 9:14 PM