संख्याबळाची जुळवाजुळव : शिवसेना, भाजपा लागली कामाला, घोडेबाजार-देवदर्शनाची चिन्हे यवतमाळ : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना व भाजपा हे दोनही पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत सोबत घेणे किंवा सत्तेसाठी त्या पक्षाचे कायद्याच्या चौकटीत राहून सदस्य फोडणे अशी व्यूहरचना केली जात आहे. विशेष असे, पद शाबूत राहत असेल तर काहींनी फुटण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचारही चालविल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये २० जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची शिवसेनेची इच्छा नाही. भाजपाने खेळलेली ‘शिवसेनेचा पालकमंत्री हटाव’ ही खेळी शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. या खेळीमुळे आता भाजपाची अडचण झाली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा विचार करीत आहे. अशीच खेळी भाजपाकडून काँग्रेसला सोबत घेऊन खेळली जाण्याची शक्यता असली तरी तसे करूनही त्यांचे संख्याबळ जुळणार नाही. सदस्यांना देवदर्शन घडविणार म्हणूनच काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य फुटू शकतात का या दृष्टीने भाजपा व शिवसेनेने चाचपणी चालविल्याची माहिती आहे. या दोनही पक्षाचे प्रत्येकी ११ सदस्य आहेत. पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका करून घ्यायची असेल तर किमान चार ते पाच सदस्य एकाच वेळी बाहेर पडणे गरजेचे आहे. एखादवेळी या सदस्यांना आजाराचे कारण दाखवून सभागृहात गैरहजरही ठेवता येईल का याचा विचार केला जात आहे. काँग्रेसमध्ये एकजूटीचे आव्हान जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रृत आहे. जिल्हा परिषदेचे निवडून आलेले ११ सदस्य वेगवेगळ्या नेत्यांच्या गटात विखुरले गेले आहेत. त्यामुळे या सदस्यांची एकजूट कायम राखण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांपुढे राहणार आहे. हे सदस्य भाजपा अथवा शिवसेनेच्या गळाला लागल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाची क्षमता उघडी पडण्यास वेळ लागणार नाही. हे सदस्य फुटल्यास ते पक्षालाच नव्हे तर नेत्यालाही मानत नसल्याचे सिद्ध होईल. राष्ट्रवादीच्या सदस्यांवर फेकले जाळे अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. राष्ट्रवादीच्या पुसद या बालेकिल्ल्यात भाजपाने आधी अॅड. निलय नाईकांना पक्षात आणून व आता जिल्हा परिषदेचे दोन सदस्य निवडून आणून आधीच सुरुंग लावला आहे. आता राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांपैकी कुणी गळाला लागतो का यासाठी भाजपाकडून जाळे फेकले जात असल्याचे सांगितले जाते. सभापतीपद व पैशाचा पर्याय ठेऊन ऐनवेळी देवदर्शनाला निघून जाण्याची आॅफर राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसच्याही सदस्यांपुढे ठेवली जात आहे. या आमिषाला काँग्रेस, राष्ट्रवादीतील कुणी बळी पडतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपा, सेना सदस्यांवरही वॉच याच निकषावर भाजपा व शिवसेनेने एकमेकांच्या पक्षातही कुणी फितूर होतो का याच्या तपासणीसाठी व्युहरचना चालविल्याची माहिती आहे. क्रॉस कनेक्शन झाले सिध्द चारही प्रमुख पक्षांचे क्रॉस कनेक्शन नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीमध्ये दिसून आले आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपाने पंचायत समित्यांमधील सत्तेसाठी चक्क काँग्रेसची साथ घेतली आहे. काँग्रेसही भाजपाला क्रमांक एकचा शत्रू मानत असताना केवळ सत्तेसाठी या पक्षाच्या बाजूला बसली आहे. काँग्रेसचे सदस्य गैरहजर ठेवण्याची सेनेची खेळी यशस्वी शिवसेनेने यवतमाळ पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी काँग्रेसच्या सदस्याला गैरहजर ठेवण्याची खेळी यशस्वी केली आहे. आता हीच खेळी जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी करण्यासाठी व त्यासाठी वेळप्रसंगी विरोधी पक्षाचे सदस्य फोडण्याची व्युहरचना केली गेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेस, राकाँचे सदस्य फोडण्याची व्यूहरचना
By admin | Published: March 17, 2017 2:31 AM