लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारी २५ नवे रुग्ण आढळले. तर तब्बल तीन जणांचा बळी गेला. कोरोनामुळे रविवारी दगावलेल्या तिघांमध्ये यवतमाळ शहरातील ५६ वर्षीय पुरुष, झरीजामणी येथील ४७ वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.दरम्यान रविवारी २३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ३२५ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी २५ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ३०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४४ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ५३० झाली आहे. तसेच रविवारी २३ कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ७८९ इतकी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३९७ जणांचा मृत्यू प्रशासनाने नोंदविला आहे.सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख २२ हजार २१० नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी १ लाख २१ हजार ५३७ अहवाल प्राप्त झाले. तर ६७३ अहवालांची प्रतीक्षा कायम आहे. तसेच १ लाख ९ हजार ७ जणांचे स्वॅब नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले.
एकूण बळीसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहोचली सुरुवातीच्या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोचा एकही बळी गेला नव्हता. मात्र नंतर झपाट्याने मृत्यूसंख्या वाढली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तर एकाच दिवशी पाच-पाच जणांचे मृत्यू नोंदविले गेले. मध्यंतरी रुग्णसंख्या आणि बळींचे प्रमाण काहीसे नियंत्रणात आले होते. मात्र आता पुन्हा रुग्ण आढळत आहे. रविवारी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३९७ पर्यंत पोहोचली आहे.