लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गाने जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू केला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ५११ एवढ्या प्रचंड प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. तर जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर १९४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मंगळवारी दगावलेल्या दोघांमध्ये बाभूळगाव तालुक्यातील ७३ वर्षीय आणि मारेगाव तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या ५११ जणांमध्ये ३०३ पुरुष आणि २०८ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील १७४, पुसद १६४, दिग्रस ३४, दारव्हा २८, पांढरकवडा १८, बाभूळगाव १७, उमरखेड १३, आर्णी १२, घाटंजी १२, वणी ९, महागाव ४, कळंब २, मारेगाव १ व इतर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी एकूण २ हजार ७३६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५११ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर २२२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १८०३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ८६ झाली आहे. गेल्या २४ तासात १९४ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार ८१६ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ४६७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८३८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १ लाख ६४ हजार ३१३ अहवाल प्राप्त तर ५२५ अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४६ हजार २२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे.
रुग्णसंख्या पहिल्यांदाच पाचशेच्या पुढे
अमरावती, नागपूर, अकोला आदी ठिकाणी नव्या वर्षात प्रचंड रुग्ण आढळत असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णवाढ नियंत्रणात होती. फेब्रुवारीत दररोज शंभर किंवा फार तर दोनशेच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. मात्र मंगळवारी चक्क ५११ रुग्ण एकाच दिवसात आढळल्याने प्रशासनही हादरले आहे. विशेष म्हणजे, सोमवारीच केंद्रीय पथकाने यवतमाळात भेट देऊन येथील उपाययोजनांचे कौतुकही केले होते. सोमवारी केवळ ५९ रुग्ण आढळले, तर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी रुग्णांचा आकडा पाचशेच्या पुढे गेल्याने सर्वसामान्य नागरिकही भीतीच्या वातावरणात आहेत.
पुसद व परिसरात कडक संचारबंदी
पुसद शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे पुसद शहरासह तालुक्यातील काकडदाती, श्रीरामपूर, धनकेश्वर, शेंबाळपिंपरी, बेलोरा, जांबबाजार, वरुड या सात ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी याबाबत मंगळवारी आदेश जारी केले. ही संचारबंदी ३ मार्च ते ८ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आली आहे. या काळात पुसद शहर व संबंधित सात ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने ही केवळ सकाळी ७ ते दुपारी १२ वाजतापर्यंतच सुरू राहतील. मात्र बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना, आठवडीबाजार संपूर्णपणे बंद राहतील. हाॅटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता त्यांना फक्त पार्सल सुविधेसाठी मुभा असेल. तर मालवाहतुकीसाठीही निर्बंध राहणार नाही. ठोक भाजीमंडई सकाळी ४ ते ६ या कालावधीत सुरु राहील. परंतु तेथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील.
दूध विक्री आणि संकलन सकाळी ७ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत करता येईल. चिकन, मटण, मच्छी मार्केट विक्री बंद राहील. कृषी केंद्र खत विक्री, बी-बियाणे विक्री सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत सुरू राहील. अंत्यविधी व लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी अनुज्ञेय राहील. दारू दुकाने बंद राहतील.