लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार जिल्ह्याने अनुभवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात आजवर तब्बल १७८६ जणांचा बळी घेतलेला आहे. दोन महिन्यापूर्वी कोरोना मृत्यूचे हे थैमान काहीसे थांबले होते. मात्र तब्बल ५१ दिवसानंतर कोरोनाने जिल्ह्यात आणखी एकाचा बळी घेतला आहे. दोन दिवसापूर्वीच झरी तालुक्यातील मुकुटबन येथील ६७ वर्षीय वृद्ध उपचारासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारादरम्यान या वृद्धाचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी आणखी दोन कोरोना बाधितही निष्पन्न झाल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे पुन्हा पुढे आले.कोरोनाने जिल्ह्यात आजवर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनाही राबवित आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होऊन त्यास वेळेस उपचार देण्यास मदत मिळत आहे. जिल्ह्यात आजवर ७२ हजार ८११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी त्यातील ७१ हजार ९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र त्यानंतरही १७८६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. १५ जून रोजी कोरोनामुळे एका ५० वर्षीय नेर येथील महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील ५० दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने ब्रेक दी चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध शिथिल केले जात असतानाच शुक्रवारी वणी येथे उपचार सुरू असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २१६० बेड उपलब्ध- कोरोना रुग्ण घटल्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये तब्बल २१६० बेड रिकामे आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ७८७ बेडपैकी दहा बेड उपयोगात असून ७७७ बेड शिल्लक आहेत. ११ डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ७५५ पैकी ७५२ खाटा तर १६ खासगी रुग्णालयातील ६३२ पैकी ६३१ खाटा रिकामे पडलेले आहेत.
घाबरु नका, मात्र दक्षता बाळगाजिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ८११ कोरोना रुग्णांपैकी ७१ हजार ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम करण्यावर प्रशासनाचा भर आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केलेली आहे. काही निर्बंध हटविण्यात आले असले तरी कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.- डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय