लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. दरदिवसाला हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्या तुलनेत औषधी व इंजेक्शन उपलब्ध नाहीत. खासगी डाॅक्टरांना मर्यादित औषधांचा वापर करून उपचार करावा लागत आहे. यामुळे रुग्णाला आजारातून बाहेर येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागत आहे. परिणामी नव्या रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नाहीत. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या रुग्णांची प्रकृती अधिक खालावत आहे. ही गंभीर स्थिती गेल्या आठवडाभरापासून निर्माण झाली.खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरापासून डाॅक्टरांनी उपचार करून अनुभव घेतलेल्या औषधांचाच तुटवडा भासत आहे. पर्यायी औषधी फारशी प्रभावी ठरत नाही. कोरोना संसर्ग एका पातळीपर्यंत असताना, रुग्णाला तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर संसर्ग फैलावण्यापासून थांबतो. हा त्याचा आजपर्यंतच्या वापरातून आलेला अनुभव आहे. म्हणूनच रुग्ण डाॅक्टरांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी आग्रह धरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. मागणीच्या अर्धाही पुरवठा होत नाही. इतकेच काय, ४० हजार रुपये किमतीच्या ‘टाॅसिलीझूमॅप’ या इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. फेव्हिपिरॅव्हीर ही गोळीसुद्धा उपलब्ध नाही. परिणामकारक औषधी नसताना उपचार करायचा कसा? असा प्रश्न डाॅक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक औषधी मिळविण्यासाठी सैरभैर फिरत आहेत. अतिरिक्त रक्कम मोजूनही औषधी मिळणे कठीण झाले आहे. ऑक्सिजनचा तंतोतंत वापर कोरोना रुग्णाला पूर्वी पूर्णक्षमतेने ऑक्सिजन दिला जात होता. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठासुद्धा मर्यादित झाला आहे. त्यामुळे रुग्णांंना तंतोतंत ऑक्सिजन द्यावा लागत आहे. याचाही परिणाम रुग्ण बरे होण्यावर होत आहे. त्यातूनच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर दरदिवसाला वाढत आहे.
रेमडेसिविर, फेव्हिपिरॅव्हीर, टाॅसिलीझूमॅपसाठी भटकंतीगेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी औषधाचा प्रोटोकाॅल ठरविला आहे. त्याला सुरुवातीला डब्ल्यू एचओनेही मान्यता दिली होती. त्याच आधारावर या औषधांचा कोरोना रुग्णांवर वापर केला. त्याचे चांगले परिणामही मिळाले. आता याच औषधी बाजारात उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात याची टंचाई निर्माण झाली आहे. मागणीच्या केवळ पाच टक्के पुरवठा होत असल्याने डाॅक्टरांना पर्यायी औषधी कोणती द्यावी, असा पेच पडला आहे. परिणामी रुग्णांना जास्त दिवस लागत आहे.
गोळ्यांच्या ६०० स्ट्रीप, तर इंजेक्शनचे २०० व्हायल प्राप्त झाले आहे. ऑक्सिजनसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ऑक्सिजन साठवण क्षमता नसल्याने काठोकाठ नियोजन आहे. भिलाईवरून ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न आहेत. - डाॅ. सविता दातीरऔषधी निरीक्षक, यवतमाळ
जिल्ह्याला आवश्यक औषधी पाच दिवसांत उपलब्ध होणार आहे. डब्ल्यू एचओच्या निर्देशाप्रमाणे उपचार करणे अपेक्षित आहे. कोरोनासाठी उपचाराचा प्रोटोकाॅल ठरलेला आहे. तो डाॅक्टरांनी पाळावा. स्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे. - अमोल येडगेजिल्हाधिकारी, यवतमाळ.
औषध, ऑक्सिजनच्या मर्यादित साठ्यामुळे रुग्णांवर गरजेनुसार वापर करावा लागत आहे. प्रत्येकाला योग्य डोस न मिळाल्याने रुग्णाला जास्त दिवस उपचारार्थ ठेवावे लागत आहे. याचा परिणाम नव्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. पर्यायी औषधी फारशी परिणामकारक नाही. - डाॅ.महेश शहाखासगी कोविड रुग्णालय संचालक