लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण २१ टक्क्यावर पोहोचले असून, ते नियंत्रणासाठी तत्काळ आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्यात याव्या, मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कोरोना उपचाराची सुविधा निर्माण केली जावी, असे निर्देश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती व उपाययोजना याचा आढावा बुधवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतला. कोरोना रुग्णाची अवस्था गंभीर आहे. सातत्याने रुग्ण आढळत आहे. अशा स्थितीत पर्याप्त साधने आहेत का, अशी विचारणा फडणवीस यांनी केली. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत काय सुविधा आहे, यावर पीएसए (प्रेशर स्वींग ॲसाॅर्पसेशन टेक्नाॅलाॅजी) मशीन बसविण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने सांगितले. ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. दुर्गम भागात कोरोना उपचार सुविधा नसल्याने रुग्ण जिल्हा मुख्यालयी येईपर्यंत त्याची अवस्था अतिशय बिकट होते. त्यामुळे तालुकास्तरावरच शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारांची सुविधा तत्काळ उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिले. या बैठकीला खासदार सुरेश धानोरकर, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उइके, आमदार संदीप धुर्वे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, सुमित बाजोरिया आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र गवार्ले, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. गिरीश जतकर उपस्थित होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत विचारणा केली असता त्यांनी यावर सध्या बोलणार नाही, असे सांगितले. राज्य सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घ्यावा. राज्य सरकार ॲक्सिलेटर पद्धतीने लस विकत घेऊन लसीकरणाची गती वाढवू शकतात. मात्र याचे नियोजन करताना लसीचा पुरवठा लक्षात घेणे गरजेचे आहे. सीरमसारखी संस्था कच्चा माल नसल्याने लसींचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करू शकत नाही. या समस्येबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी संपर्क केला. अमेरिकेनेही भारताला अडचणीच्या काळात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेकडून कच्चा माल मिळाल्यानंतर कोरोना लसीच्या निर्मितीला गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अस्थायी सहायक प्राध्यापकांनी आंदोलन करू नये कोविडमध्ये सेवा बजावणाऱ्या अस्थायी सहायक प्राध्यापकांनी सेवेत नियमित करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला. या प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन दिले. या संकटाच्या काळात आंदोलन करू नये, त्यांची मागणी अतिशय रास्त असून राज्य शासनाकडे त्यांना सेवेत नियमित करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.