हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : कोरोनावर कधी तरी औषध सापडेलही मात्र माणसांच्या स्वभावाला औषध सापडण्याची सुतराम शक्यता नाही. कोरोनातून बरे झालेल्या आणि ‘नॉर्मल’ जगू पाहणाऱ्या माणसांना बहिष्कृत करू नका, असे शासनाने कितीही सांगितले तरी आर्णीतील नागरिक सौजन्याची ऐसीतैसी करीत आहे. कोरोनाची शिकार ठरलेल्या आणि आता त्यातून मुक्त झालेल्या कुटुंबाला तब्बल दोन महिन्यांपासून गाववासीयांनी वाळीत टाकले आहे.माणूसकीला काळिमा फासणारी ही कहानी येथील मानवता मंदिराच्या परिसरात उघडकीस आली. येथील रहिवासी नसीमाबी ही महिला मे महिन्यात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी दिग्रसमध्ये गेली होती. तेथून परतल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे १७ जून रोजी तिला आर्णीतून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २५ जुलै रोजी ती पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतली. मात्र तिचे आधीचे आजार बळावले आणि २० ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.जीव गेला, मात्र इथूनच एका दुखद कहानीचा जन्म झाला. नसीमाबीचे पती अजीस खान, मुलगा अहेमद खान हे दोघे ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा चालवितात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या ऑटोरिक्षात कुणीही बसायला तयार नाही. दिवसभरात एका नव्या पैशाचाही धंदा होत नसल्याने सहा जणांचे हे कुटुंब उपासमार सोसत आहे. अजीस खान येथील तहसील पॉर्इंटवर तर अहेमद खान शिवनेरी पॉर्इंटवर ऑटोरिक्षा लावत होते. मात्र तेथे कुणीही त्यांना दाद देत नसल्याने त्यांनी वेगवेगळ्या पॉर्इंटवर ऑटोरिक्षा उभे करून पाहिले. तरीही कोणी प्रवासी त्यांच्या ऑटोरिक्षात बसत नाही.केवळ व्यवसायावरच हा बहिष्कार घालण्यात आलेला नसून या कुटुंबीयांशी साऱ्यांनी नाते तोडले आहे. शेजारी-पाजारीही बोलायला तयार नाही. त्यामुळे घरातील महिला आणि मुलांचे जीवन कठीण झाले. वास्तविक नसीमाबी जुलैमध्येच कोरोनामुक्त झाल्या होत्या. कुटुंबात कुणीही कोरोना पॉझिटिव्ह नाही. तरीही लोकांनी संबंध तोडल्याने त्यांच्यावर कोरोना पेक्षाही वाईट अवस्था ओढवली. आर्णीकरांनी शासनाचे, प्रशासनाचे व स्वत:च्या सुज्ञ मनाचे तरी ऐकून या कुटुंबीयांना जगू द्यावे, एवढीच अपेक्षा.२५ ते ३० वर्षांपासून आम्ही ऑटो चालवित आहो. मात्र ज्यांच्याशी वर्षानुवर्षे संबंध आहे, ते प्रवासीही आमच्या ऑटोत आता बसत नाही, त्यामुळे आमचा आधारच खचला.- अजीस खान, आर्णीमाझी आई आर्णीतील पहिला कोरोना रुग्ण ठरली. त्यामुळे कदाचित तिची अधिक चर्चा झाली. मात्र आता जशी वागणूक आम्हाला मिळत आहे, तशी किमान इतर रुग्णांच्या नातेवाईकांना तरी मिळू नये.- अहेमद खान, आर्णी
कोरोनाने मारुन सोडले पण समाजाने बहिष्कृत करून घरात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:00 AM
येथील रहिवासी नसीमाबी ही महिला मे महिन्यात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी दिग्रसमध्ये गेली होती. तेथून परतल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे १७ जून रोजी तिला आर्णीतून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २५ जुलै रोजी ती पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतली. मात्र तिचे आधीचे आजार बळावले आणि २० ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देआर्णीतील ऑटोरिक्षा चालक कुटुंब रोजगाराला मोताद : पत्नीच्या मृत्यूनंतर घरातील सहा जणांशी कुणीही बोलेना, नातेही तोडले