लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटामुळे यावर्षी एक तर शाळाच भरल्या नाही. दुसरे म्हणजे शेकडो मुले शाळांमध्ये दाखलच झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव असल्यामुळे ही शोधमाेहीम राबवताना अनेक अडचणी येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा वेळी शिक्षकांना शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी दारोदारी फिरण्याचे आदेश मिळाले आहेत. यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्यासाठी निमंत्रण मिळणार नाही का असा सवाल शिक्षकांनीच उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे खुद्द यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी यवतमाळच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ‘जरा सांभाळून’ राबवावी, अशी सूचना केली आहे. मात्र शोधमोहिमेसाठी राज्य स्तरावरून समित्या गठित झाल्या आहे. नेर, बाभूळगाव, यवतमाळ सारख्या तालुक्यात ही मोहीम जोरदार राबविली जात आहे. तर काही तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्यापही मोहिमेला सुरुवातच करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे शाळा बंद आहे. मग शाळाबाह्य मुले शोधून त्यांना दाखल कुठे करणार, कोण शिकवणार याची उत्तरे शिक्षण विभागाकडे नाही. मोहिमेच्या आडून पटनोंदणी होत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
तालुकानिहाय पथके
शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे एक-एक पथक नेमण्यात आले आहे. मात्र एकाच गावात विविध परिसरासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. यात सर्वाधिक शाळांची संख्या पुसद आणि उमरखेड तालुक्यात असल्यामुळे तेथे पथकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय यवतमाळ शहर आणि पांढरकवडा परिसरात पथकांचे प्रमाण अधिक असल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे.
अधिकारी अद्याप फिरकलेच नाही !
यवतमाळ शहराबाहेर धामणगाव मार्गावर भटक्या लोकांची राहुटी आहे. तेथे तीन छोट्या मुली आणि सात ते आठ मुले आहेत. या राहुटीला भेट देऊन विचारणा केली असता, तेथील पालक म्हणाले, आमच्या मुलांच्या शाळेबाबत विचारणा करण्यासाठी आजपर्यंत कोणतेही अधिकारी आलेले नाही. शाळा कुठे आहे तेही आम्हाला माहिती नाही.
दारव्हा मार्गावरील एमआयडीसी परिसरात भटक्या लोकांची आणखी एक राहुटी आहे. तेथेही जवळपास १५ छोटी मुले पालकांसह आहेत. मात्र या ठिकाणीही शाळाबाह्य मुलांचा शोध घेणारे पथक अद्याप पोहोचलेेले नाही. पालकांसोबत पडेल ते काम करणे आणि जमेल तसे उघडे नागडे जगणे असा दिनक्रम सुरू आहे.
अन्य विभागाचे कर्मचारी मोहिमेत उदासीन
शालेय शिक्षण विभागाने यावेळी पहिल्यांदाच शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य, विभाग ते जिल्हा व तालुका पातळीपर्यंत नियंत्रण समित्या गठित करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष खुद्द जिल्हाधिकारी असून या मोहिमेसाठी शिक्षकांसोबतच महसूल व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही पथकात समावेश करण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यात शिक्षकांव्यतिरिक्त कोणत्याही विभागाचे कर्मचारी या मोहिमेत अजून तरी सहभागी झालेले नाही. याबाबत विचारणा केली असता अन्य विभागांचे कर्मचारी कोरोनाच्या कामात गुंतलेले असल्याचे सांगण्यात आले. तर कोरोना संकटात हे सर्वेक्षण का करण्यात येत आहे, असा सवालही अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
सर्वे सुरू - शिक्षणाधिकारी
प्रत्येक तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत शिक्षकांचे पथक नेमण्यात आले आहे. त्यांना गावे किंवा परिसर वाटून दिला असून ही पथके डोअर-टू-डोअर जावून शाळाबाह्य मुलांचा सर्वे करीत आहे. मात्र जेथे कन्टेन्मेंट झोन आहे, तेथे सर्वेक्षणासाठी न जाण्याच्या सूचना आहे. - प्रमोद सूर्यवंशी,प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेबाबत जिल्हास्तरीय समितीची २६ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सहअध्यक्ष तथा सीईओ डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी व दीपक चवणे उपस्थित होते.