अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातून दीड हजार लोकांचा बळीही गेला. मात्र जिल्ह्यातील तब्बल १५ लाख लोक तंबाखू चघळत-चघळत हळूहळू मृत्यूला निमंत्रण देत आहेत. तोंडावर मास्क घालून कोरोनाचा विषाणू बाहेर रोखणारे अनेक नागरिक मास्कच्या आडून तोंडात तासनतास तंबाखूच्या रुपाने कॅन्सर पाळत असल्याचे वास्तव आहे. सोमवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. त्यानिमित्त कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आलेली व्यसनाधीनतेची भयावह परिस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न... केंद्र शासनाने केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्येपैकी ४६.६ टक्के पुरुष आणि १२.३ टक्के महिला दरदिवशी तंबाखू चघळतात. विशेष म्हणजे, हे सर्वेक्षण केवळ १५ वर्षांवरील नागरिकांचेच करण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यात १५ वर्षांखालील अनेक मुलेही तंबाखू खात असल्याचे वास्तव आहे. ही शासकीय आकडेवारी पाहता, जिल्ह्यात अर्धी लोकसंख्या म्हणजे जवळपास १५ लाख लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत. दिवसभर आणि रात्रभर जबड्याखाली तंबाखूची चिमूट ठेवणारे नागरिक स्वत:च कॅन्सरच्या जबड्यात अडकत चालले आहेत. या शिवाय, तंबाखू-चुना मळून खाणाऱ्यांसोबतच गुटखा, खर्रा या रूपात तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेतल्यास जवळपास ७५ टक्के जिल्हा तंबाखूच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते. आश्चर्य म्हणजे, जिल्ह्यात गुटखाबंदी आहे. बंदी झुगारून, जादा पैसे मोजून व्यसन भागविणाऱ्या महाभागांमध्ये जसा धनाढ्य मंडळींचा समावेश आहे, तसाच रोज मजुरी करणाऱ्यांचाही आहे. उलट ५-१० रुपयांत भागणारे व्यसन म्हणून गोरगरीबच अधिक आहारी गेले आहेत. दरवर्षी २०० जणांना कॅन्सर होतोयमहाराष्ट्रात दरवर्षी १५ हजारांवर लोकांना कॅन्सर होतोय. तर, जिल्ह्यात वर्षाला ७०० च्या आसपास कॅन्सरचे रुग्ण नोंदविले जात आहेत. त्यातील जवळपास २०० लोकांना म्हणजे २७ टक्के लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतोय. विशेष म्हणजे, अशा केसेसमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण ७० टक्के इतके अधिक आहे. कारण, यात एकतर जबड्याची किंवा जिभेची शस्त्रक्रिया होत असल्याने आहारावर विपरित परिणाम होतो. रुग्ण अशक्त बनतो. शिवाय, शस्त्रक्रियेनंतरच्या रेडिएशन, किमोथेरपीसारखे उपचार अनेक जण सहनही करू शकत नाही, अशी माहिती यवतमाळ येथील ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरचे सतीश मुस्कंदे यांनी दिली.