लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे रुग्ण घटल्याने जिल्हा ७ जूनपासून अनलाॅक करण्यात आला होता. मात्र अनलाॅक काळात गर्दी वाढून संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध घातले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र ४ ते १० जून या आठवडाभरात संपूर्ण बाजारपेठ खुली असूनही जिल्ह्यात संसर्ग दर आटोक्यातच म्हणजे २.९१ टक्के राहिला. त्यामुळे पुढचा आठवडाही जिल्ह्यात कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही.गेल्या सव्वा वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने बस्तान मांडले आहे. त्यामुळे बाजारपेठे सतत बंद ठेवावी लागली होती. नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आली होती. लाॅकडाऊनचा जाच सोसल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात कशीबशी नियंत्रणात येत आहे. सात हजारांवर पोहोचलेला ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता सहाशेपर्यंत खाली आला आहे. याच दरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने विविध जिल्ह्यात निर्बंध हटविण्यासाठी जिल्ह्यांच्या पाच श्रेणी निश्चित केल्या. त्यासाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता २० टक्के पेक्षा अधिक असणे आणि पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असणे हे दोन महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्हा श्रेणी एकमध्ये समाविष्ट होता. त्यावेळी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर हा १.२६ इतका होता. तर २२७९ बेडपैकी २०६३ बेड उपलब्ध होते. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ७ जूनपासून जिल्हा अनलाॅक केला. जिल्ह्यातील बाजारपेठेवरील सर्व बंधने हटविण्यात आली. तसेच संचारबंदी व जमावबंदीचा आदेशही मागे घेण्यात आला. परंतु, निर्बंध हटविले तरी प्रत्येकासाठी मास्कचा वापर अजूनही बंधनकारकच आहे. अनलाॅक काळात दर आठवड्याला जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आणि परिस्थिती पाहून गरज भासल्यास पुन्हा निर्बंध घातले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या ६ जूनच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.विशेष म्हणजे, राज्यात विविध जिल्हे अनलाॅक झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने आता ४ ते १० जून या कालावधीतील विविध जिल्ह्यांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या आढव्यात ज्या जिल्ह्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा वाढला आहे, तेथे पुन्हा एकदा निर्बंध घातले जाणार आहेत. सुदैवाने यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर १० जून रोजीही २.९१ इतका आहे. तर ऑक्सिजन बेडची उपलब्धताही २० टक्केपेक्षा जास्त आहे.
अशी आहे जिल्ह्यातील सध्यस्थिती - ४ ते १० जून या काळात जिल्ह्यात ४४ हजार २३८ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी केवळ १२८६ नागरिक पाॅझिटिव्ह आढळले. हा संसर्ग दर २.९१ टक्के होता. हा दर पाच टक्क्यांच्या खालीच असल्याने यापुढेही निर्बंध घातले जाणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील एकंदर बेडपैकी केवळ ५.२८ टक्के बेडवरच रुग्ण आहेत. तर अन्य बेड रिकामे आहेत. ३७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण असून ८३७ बेड रिक्त आहेत. तर फक्त १६ व्हेंटीलेशन बेडवर रुग्ण असून ११३ बेड रिक्त आहेत.
शासनाच्या यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे आपला जिल्हा लेव्हल वनमध्ये होता. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के अनलाॅक झाले. तर आता आठवडाभराच्या आढाव्यानंतरही आपण लेव्हल वनमध्येच आहो. त्यामुळे जिल्ह्यात कोणतेही बंधने घातली जाणार नाहीत. दुर्दैवाने जर पुढच्या आठवड्यात संसर्ग दर वाढला तर पुन्हा बंधने घालावेच लागतील.
- अमोल येडगे, जिल्हाधिकारी