किशोर वंजारीलोकमत न्यूज नेटवर्कनेर : सुखासमाधानाच्या संसाराला कोरोनाची दुष्ट लागली. पाच मुले आणि ती उघड्यावर आली. चरितार्थ चालविण्याची चिंता लागली. पण हरली नाही. पतीच्या व्यवसायाला पुढे नेण्याचा निर्धार केला. हाती ऑटोरिक्षाचे स्टेअरिंग घेतले. होणाऱ्या कमाईतून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परजना गावातील स्वाभिमानी असलेल्या अरुणा समाजासाठी प्रेरणावाट ठरली आहे. नेर तालुक्यातील परजना गावातील अशोक जाधव (४०) यांचा एप्रिल २१मध्ये कोरोनाने बळी घेतला. ऑटोरिक्षा चालवून ते उपजीविका करायचे. त्यांच्या अकाली मृत्यूने पत्नी अरुणा अशोक जाधव (३१) हतबल झाली. जगण्याचा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. शेतमजुरी करून पाच लेकरांसह स्वत:चे पोट कसे भरायचे ही चिंता तिला लागली.मात्र, धीर सोडला नाही. पतीचा ऑटोरिक्षा चालवण्याचा निर्णय तिने घेतला. आता ती दररोज परजना ते नेर मार्गावर प्रवासी ऑटोरिक्षा चालविते. अरुणाच्या धाडसाची दखल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषाताई काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांनी घेतली. थेट खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संवाद करून दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील ४६० कुटुंबातील मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली. यात त्यांनी अरुणा जाधव यांच्या मुलांचाही समावेश करून घेण्यासाठी अहवाल पाठविला. मात्र, सध्यातरी अरुणासमाेर ऑटोरिक्षा चालवून पोट भरण्याशिवाय पर्याय नाही.
पतीच्या निधनानंतर शिकल्या ऑटोरिक्षाअरुणा जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर त्या ऑटोरिक्षा शिकल्या. आज या व्यवसायातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यांची मोठी मुलगी अमृता आठव्या वर्गात शिकते. अर्पिता, उत्कर्ष, यश आणि अंगणवाडीत शिकणारा आदर्श या पाच जणांसह स्वत:चा उदरनिर्वाह ती करते. मदतीसाठी अनेकांनी आश्वासने दिली. मात्र, अजूनतरी कुठल्या राजकीय पुढाऱ्यांकडून मदतीचा हात मिळाला नाही. उपजीविकेचा ऑटोरिक्षा हाच योग्य मार्ग असल्याचे त्या सांगतात.
अरुणा जाधव हिला मदत करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. मुलांचे पालकत्व स्वीकारून या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. - मनीषाताई काटे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस