शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. चाचण्यांना वेग देण्यात आला आहे. न्यायालयासमोरील वाचनालय आणि बाजारपेठेतील वाचनालयात व्यापारी आणि त्यांच्या संपर्कातील इतरांची चाचणी सुरू आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही टेस्टिंग सुरू आहे. शक्रवारी तालुक्यात एकूण ६११ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.
शहर आणि लगतच्या सर्व व्यापारी दुकानांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसांत सर्व दुकानदारांनी चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांची दुकान उघडण्याची परवानगी रद्द करून दुकान बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामसेवक, पंचायत समितीतील कर्मचारी, सर्व रास्त भाव दुकानदार व त्यांचे कर्मचारी, व्यापारी व त्यांचे कर्मचारी, सर्व कोतवाल यांची रॅपिड टेस्ट होणार आहे.
टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्हचे प्रमाणपत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी केले आहे.