सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोराना रुग्णांची व संशयितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रॅपीड टेस्ट किट्सचा उपयोग करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णालयामध्ये अशा टेस्ट केल्या जात नाही. कोरोना लॅब वाढविण्यासाठी पाच जिल्ह्यांना मंजूर मिळाली आहे. येथील मशीन्स खरेदीसाठी हॉपकीन्स महामंडळाकडून विदेशातील कंपनीला ऑर्डरही देण्यात आली आहे. या मशीन्स सिंगापूर येथून येतात. या देशातही लॉकडाऊन असल्याने मशीन्स तेथे अडकून पडली आहे. पुरवठादार कंपनीने किमान २० दिवस लागली असे कळविले आहे.विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया तर बारामती, जळगाव येथे कोरोना टेस्टींग लॅब तयार करण्याला परवानगी मिळाली आहे. येथील लॅब सुरू करण्यासाठी हॉपकिन्स महामंडळाकडून तशी मागणी विदेशी कंपन्यांकडे करण्यात आली आहे. थर्मोफिशर आणि बायो रॅड या कंपन्या कोरोना टेस्टिंगसाठी ‘रिअल टाईम पीसीआर’ मशीन्स चा पुरवठा करणार आहेत. या मशीनमध्ये २४ तासात २०० तपासण्या करणे शक्य आहे. कोरोना विषाणूचा आरएमने वेगळा करून तपासणी केली जाते. यूएसए ते सिंगापूर तेथून मुबंई व नंतर संबंधित जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला ही मशनरी पाठविण्यात येत आहे. हा दीर्घ प्रवास करण्यासाठी लॉकडाऊनचा अडसर येत आहे. कार्गोची सेवा ही आठवड्यातून एकदाच असल्याने त्यावर प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे राज्यातील पाचही वैद्यकीय महाविद्यालयांना आणखी २० दिवस कोरोना टेस्टींगसाठी रिअल टाईम पीसीआर मशनीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. वेळेवर धावपळ नको म्हणून वैद्यकीय महाविद्यालयांनी डॉक्टर व तंत्रज्ञांना प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील एक डॉक्टर व पाच तंत्रज्ञांना नागपूर एम्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसचे ही लॅब उभारण्यासाठीच संपूर्ण सिव्हील वर्क पूर्ण केले आहे. मशनरी कधी मिळणार, याचीच प्रतीक्षा आहे. स्थानिक पातळीवर तपासण्या झाल्यास कामाची आणखी गती वाढणार आहे.