यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक तब्बल नऊ लाख लसींच्या डोजची आवश्यकता असून उपलब्ध साठा गुरुवारी सायंकाळी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी यवतमाळात दाखल झाले. या पथकाने पाटीपुरा येथील लसीकरण केंद्राला भेट देवून उपस्थित यंत्रणेशी चर्चा केली. यावेळी सीईओ पांचाळ यांनी लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्याला एकूण नऊ लाख डोजेस लागणार आहेत. आतापर्यंत एक लाख ५४ हजार डोज प्राप्त झाले असून त्यापैकी १ लाख ४१ हजार ६२४ डोज देण्यात आले आहे. सध्या १३ हजार डोज शिल्लक आहे. परंतु गुरुवारी सायंकाळपर्यंत हा साठा संपणार आहे. शासनाकडे डोजची मागणी करण्यात आली आहे. डोजचा पुरवठा पाईपलाईनमध्ये आहे. मागणीनुसार साठा उपलब्ध करून दिला जात आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे १७८ केंद्र मंजूर करण्यात आले. त्यापैकी १२७ केंद्र सुरू आहे. लस उपलब्ध नसल्याने ५१ केंद्रांवरील लसीकरण थांबले आहे. कोणत्याही केंद्रावर १०० जणांना डोज दिला जातो. अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत यावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत लसीचा साठा उपलब्ध झाला तरच शुक्रवारी जिल्ह्यात लसीकरण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.