लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण महाराष्ट्रात फक्त यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी गुद्दलपेंडी हा दमदार मारामारीचा खेळ खेळण्यात येतो, मात्र कोरोना वायरसमुळे गुद्दलपेंडी हा अनोखा खेळ होणार नसल्याने सर्व खेळाडू व रसिक निराश झाले आहेत.
संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं, मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुंला स्पर्धक, व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्यांना ठोसे लावणे सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण दोर सोडेल याची उत्कंठा शिगेला. अखेर एक स्पर्धक दोर सोडतो आणि पराभव स्वीकार करतो. हा रोमांचक आणि थरारक खेळ आहे गुद्दलपेंडी. जो केवळ धुलीवंदनालाचं खेळला जातो आणि महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी खेळला जातो ते गाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले वणी. ही लढत दोन ते पाच मिनिटांपर्यंत चालते. विजयी व पराभूत झालेला स्पर्धक एकमेकांची गळाभेट घेतात आणि ती लढत तिथे संपते.
हा खेळ तसा मारधाड आणि ऍक्शनचे भरपूर आहे. मारामारीत बदले की आग वगैरे ही आहे. पण हा जरी मारधाड करण्याचा खेळ असला तरी याचा उद्देश मात्र वैर संपवणे आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असले की ते लोक गुद्दलपेंडीत लढायचे. ठोसे लगावून एकमेंकांवरचा पूर्ण राग काढायचे. जसा चित्रपटात मारधाड नंतर शेवट गोड होतो, तसाच या खेळात लढत संपली की गळाभेट घेऊन लढतीसोबतच वैरही संपवलं जातं.मागील वर्षीही कोरोनाच्या सावटामुळे हा अनोखा खेळ रद्द करण्यात आला होता आणि यावर्षीही कोरोनामुळे रद्द झाल्याने खेळाडू आणि रसिकांमध्ये नाराजी आहे .