लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवजड एसटी बस चालविण्यासाठी सज्ज झालेल्या राज्यातील पहिल्या महिला चालकाच्या नोकरीत कोरोनाने खोडा घातला आहे. वर्षभराचे खडतर प्रशिक्षण घेऊनही १ ऑगस्टपासून मिळणारी नोकरी लांबली आहे.राज्यात एकमेव यवतमाळ जिल्ह्यात २१ आदिवासी तरुणींना एसटी चालक म्हणून राज्य शासनाने संधी दिली होती. शिक्षण घेऊनही बेरोजगारी भोगणाऱ्या, शेतीत मोलमजुरी करणाऱ्या धाडसी तरुणींनीही ही संधी जाणीवपूर्वक पटकावली होती. जानेवारी २०१८ पासून परिवहन महामंडळाने ही निवड प्रक्रिया सुरू केली. यवतमाळ जिल्ह्यातील २१ तरुणींची निवड केल्यानंतर पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रात सहा महिने प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या तरुणींना यवतमाळात आणून प्रत्यक्ष बस चालविण्याचे प्रशिक्षण देणे सुरू झाले होते. १ आॅगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२० पर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत प्रत्यक्ष रुजू करून घेतले जाणार होते.मात्र कोरोनाने मार्च महिन्यापासून त्यांना प्रशिक्षण घेता आले नाही. आता प्रशिक्षणच पूर्ण झाले नाही, तर रुजू कसे करणार, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. मार्च ते जुलै या काळातील प्रशिक्षण कधी पूर्ण होणार, याबाबतही अनिश्चितता आहे.महामंडळाकडे नाही पगाराची सोयसर्वात महत्त्वाचे म्हणजे, मध्यंतरीच्या काळात झालेल्या सरळसेवा भरतीतून आणखी आठ महिलांना जिल्ह्यात चालक होण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्यांनाही अद्याप पांढरकवडा प्रशिक्षण केंद्रात जाऊन प्रशिक्षण पूर्ण करता आलेले नाही. शिवाय, लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळ सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाच केवळ ५० टक्के पगार देऊ शकत आहे. नव्या पुरुष चालकांनाही सध्याच बसफेरीचे ‘शेड्यूल’ दिले जात नाही. त्यामुळे नव्या २९ महिला चालकांच्या प्रत्यक्ष नोकरीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.पांढरकवडाचे केंद्र हे निवासी स्वरुपाचे असल्याने तेथे लॉकडाऊन काळात प्रशिक्षण शक्य नव्हते. आता उर्वरित प्रशिक्षण कधी पूर्ण करता येईल हे सध्याच सांगता येणार नाही. मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरही त्यांना उपनिवड समितीपुढे एमयू टेस्ट पास करावी लागणार आहे. त्यातून निवड झाली तरच त्यांना नोकरी मिळेल. राज्यात कोठेही नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.- सुदेशना खरतडे,वरिष्ठ लिपिक, परिवहन महामंडळयाच त्या २१ तरुणीएसटीत चालक होण्यासाठी सज्ज असलेल्या तरुणींमध्ये महानंदा संजय ठाकरे, रंजना राजू शेळके, शितल रमेश पवार, सुवर्णा जानरावजी कुमरे, पूजा दिलीपराव टेकाम, शिल्पा श्यामराव ताडाम, गायत्री नंदकिशोर होलगरे, हर्षा विठ्ठल लडके, मनिषा अर्जुन गाडेकर, ज्योत्स्ना अंबादास ठाकरे, पूजा खमेश नैताम, सपना अरुण कुळसंगे, अंजुता इलाहाबाद भोसले, अनुसया मधुकर मडावी, सुवर्णा मनोहर नागमोते, शिल्पा सखाराम पेंदोर, सुशिला गोपाळ वडेकर, सीमा सुनिल गवळी, राधा धनराज दाभेकर, सुवर्णा भूपेंद्र मेश्राम, नम्रता शेषराव आगलावे यांचा समावेश आहे.
‘लेडीज ड्रायव्हर’च्या नोकरीत कोरोनाचा ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:00 AM
राज्यात एकमेव यवतमाळ जिल्ह्यात २१ आदिवासी तरुणींना एसटी चालक म्हणून राज्य शासनाने संधी दिली होती. शिक्षण घेऊनही बेरोजगारी भोगणाऱ्या, शेतीत मोलमजुरी करणाऱ्या धाडसी तरुणींनीही ही संधी जाणीवपूर्वक पटकावली होती. जानेवारी २०१८ पासून परिवहन महामंडळाने ही निवड प्रक्रिया सुरू केली. यवतमाळ जिल्ह्यातील २१ तरुणींची निवड केल्यानंतर पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रात सहा महिने प्रशिक्षण देण्यात आले.
ठळक मुद्दे२१ जणींना प्रतीक्षा, एसटीच्या प्रशिक्षणावर लॉकडाऊनची गदा, सरळ सेवेतील आठ महिलाही वंचित