लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या धास्तीमुळे आधीच जनजीवन विस्कळीत झालेले असताना अवकाळी पावसानेही जिल्ह्यात आठवडाभरापासून कहर माजविला आहे. आठवडाभरात चार हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, केळी, भाजी, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा इत्यादी पिकांचा समावेश आहे.१८ मार्चपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या तालुक्यात पाऊस बरसतो. या सोबत गारपीटही होते. याची धास्ती गाव खेड्यात लोकांना बसली आहे. शेतकऱ्यांनी गतवर्षीचा अंदाज लक्षात घेता यावर्षी गव्हाची उशिरापर्यंत पेरणी केली. हा गहू आता काढणीस तयार झाला आहे. याच सुमारास अवकाळी पावसाने जिल्हाभरात थैमान घातले आहे. मजुराच्या कमतरतेने शेतशिवारात गहू उभा आहे. त्याला पर्याय म्हणून वापरले जाणारे हार्वेस्टर प्रत्येक ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या स्वाधीन करावा लागत आहे.गत आठ दिवसात जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावात, अनेक तालुक्यात शेती पिकाचा सर्वे करणारी यंत्रणा पोहोचलीच नसल्याचा आरोप गावकरी करीत आहे. कोरोनाच्या भीतीने कृषी सहाय्यक, तलाठी, शेतशिवारात जात नाही. जाण्यासाठी पोलिसांचा मज्जाव असल्याचे कर्मचारी सांगत आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीत नेमके किती नुकसान झाले याचा खरा आकडा अजूनही पुढे आला नाही. नेर, पुसद, उमरखेड आणि आर्णी या चार तालुक्याचाच अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. इतर तालुक्याची कुठलीही माहिती कृषी विभागाकडे नाही. सोळाही तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान उमरखेड तालुक्यात झाल्याची नोंद चार तालुक्याच्या अहवालातून पुढे आली आहे. या ठिकाणी १६०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. आर्णी तालुक्याला २० हेक्टरचे नुकसान झाले. पुसद तालुक्यात १५२ हेक्टरवर नुकसान झाले. नेर तालुक्यात १२० हेक्टरचे नुकसान झाले.इतर तालुक्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान केले. त्याची कुठलीही नोंद कृषी विभागाकडे झाली नाही. याच परिस्थितीत शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी कामकाज करीत आहे. प्रशासनाची यंत्रणा हा संपूर्ण प्रकार दुरुन पाहत आहे.गारपिटनंतरही नुकसान अहवाल नील कसा?वणी, दारव्हा या दोन तालुक्यांमध्ये गत आठवड्यात आणि रविवारी गारपीटीचा मोठा फटका बसला. प्रत्यक्षात या दोन्ही तालुक्याचा नुकसानीचा अहवाल निरंक आला आहे. मुळात या तालुक्यांमध्ये सर्वे करणारे कर्मचारी पोहोचले नाही.भाजीपाला, फळ पिकांचे मोठे नुकसानगहू आडवा झाला आहे. काही ठिकाणी गारपिटीने हरभºयाच्या घाट्या गळून पडल्या आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांभार, पालक, मेथी, पालेभाज्या, टमाटर, ढेमसे, वांगे, फुलकोबी, पानकोबी, काकडी, आंबा, पपई, संत्रा पिकालाही याचा फटका बसला.