लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले अनेक दिवस कोरोना व लाॅकडाऊनमुळे विवाह सोहळे थांबले होते. मात्र आता अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आणि लग्नाचे मुहूर्तही भरपूर आलेत. त्यामुळे विवाह सोहळे वाढत आहेत. पण कोरोनाची धास्ती कायम असल्याने प्रशासनाने नियमावली कायम ठेवली आहे. त्यामुळे दिवाळीपासून सुरू होणाऱ्या लग्नांच्या धुमधडाक्याला कोरोनेचा अडसर कायम आहे.शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.
मंगल कार्यालयांना बुकींगची प्रतीक्षादिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे आणि लाॅकडाऊनही शिथिल झाले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये पटापट बुकींग होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही बुकींग होत नसल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. शासनाने उपस्थितीवरील मर्यादा हटविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
हाॅटेलमध्ये मर्यादित ‘पॅकेज’सध्या लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे. मात्र लग्नातील उपस्थितीवर मर्यादा कायम आहे. त्यामुळे कमी पाहुण्यांसाठी भलेमोठे मंगल कार्यालय बुक करण्यापेक्षा लोक टुमदार हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. तेथे छोट्या उपस्थितीकरिता विशेष ‘पॅकेज’ दिले जात आहे. हाॅटेलमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना ‘ईव्हेन्ट’चे स्वरूप दिले जात असल्याने प्रशासनाकडूनही कडक कारवाई होताना दिसत नाही.
बुकींगला काही रिस्पाॅन्स नाही. कारण शासन कधी निर्णय बदलवेल, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. शासनाने लग्न समारंभात किमान २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली पाहिजे. - मालीराम शर्मा, संचालक, हरितपाल मंगलम
लग्नाचे बुकींग नसल्याने मेन्टनन्सचा खर्चही निघत नाही. शासनाने नियमच भरपूर लावून ठेवले आहेत. त्यामुळे लोक हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. लग्नसमारंभात परवानगीपेक्षा जादा लोक येतात. त्यांना कोण रोखणार? रोखल्यास भांडणे होतात. - प्रमोद तातेड, संचालक, नवजीवन मंगलम