लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापाठोपाठ आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळाही सुरू होण्याचे संकेत आहे. याबाबत अद्याप लेखी आदेश नसले तरी स्थानिक यंत्रणेने पूर्वतयारी सुरू केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पातील १८ शासकीय व २८ अनुदानित तसेच पुसद प्रकल्पातील सहा शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे शालेय शिक्षण विभागापेक्षाही अधिक काटेकोर ‘एसओपी’ पाळण्याची गरज आहे. त्याकरिता प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक पूर्वतयारीसाठी झटत आहेत.
शालेय शिक्षण विभागाप्रमाणे आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाचा लेखी निर्णय यायचा आहे. तो येताच आश्रमशाळा सुरू होतील. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने तेथे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. ते सुरू आहे. - आत्माराम धाबेप्रकल्प अधिकारी, पुसद
काय काळजी घेणार?लेखी आदेश येणे बाकी असले तरी आदिवासी आश्रमशाळांच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. त्यात शाळेची पूर्वतयारी केली जात आहे.
कोरोना काळात गावाकडे परतलेल्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांमार्फत संपर्क केला जात आहे. पालकांना विश्वास घेऊन वाटचाल सुरू आहे.
आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. शाळा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे तेथील धान्य वाळवून घेतले गेले. तर बेडची कापड धुवून घेतली गेली आहे.
वर्गखोल्यांची दुरुस्ती केली गेली. तर वर्गखोल्या व वसतिगृह पूर्णपणे सॅनिटाईज करून घेतल्यानंतरच आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना आणले जाणार आहे. कोरोनामुळे दक्षता घेतली जात आहे.
कोविड सेंटरसाठी शासनाकडून ताब्यात
रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे अधिग्रहीत केलेले वसतिगृह व आश्रमशाळा आता प्रशासनाने मोकळ्या केल्या आहे. सॅनिटाईज करून या इमारती विद्यार्थ्यांसाठी वापरण्यास सज्ज आहे.