यवतमाळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्या अंतर्गत विविध निर्बंध घालण्यात आले आहे. बाजारपेठेची वेळ सायंकाळी ८, तर हॉटेल-रेस्टॉरंटची वेळ ९.३० पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या निर्बंधाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शुक्रवारी सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले.
जिल्हाधिकारी यांनी स्वत: बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बस स्थानक चौक व इतरही भागाला भेटी दिल्या. पायी फिरून नागरिकांना निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, डॉ. विजय अग्रवाल आदी होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे बाजारपेठेतील वातावरणात कडक नियमांचे पालन होताना दिसले. व्यापाऱ्यांनीही काळजी घेत, कोरोना नियमावलीचीं सक्ती ग्राहकांना केली होती.