यवतमाळ - येथे आयसोलेशन वॉर्डमध्ये सोमवारपर्यंत एकूण सात जण पॉझिटीव्ह होते. मात्र यापैकी एकाचा निगेटिव्ह रिपोर्ट रात्री उशिरा वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाल्यामुळे आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सहावर आली आहे. आतापर्यंत एकूण 16 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जण निगेटिव्ह झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. हे यश सर्वांच्या सहकार्याने मिळाले असून उर्वरीत सहा रुग्णसुध्दा निगेटिव्ह करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी. पुढील 14 दिवस हे युध्द आपल्याला लढायचे आहे. यात नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, घराच्या बाहेर न पडणे, मास्क लावूनच अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे आदी सुचनांचे आपण पालन केले तर आपला जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख लोकांनी ‘Aarogya Setu’ हे ॲप प्लेस्टोअर वरून डाऊनलोड केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले हे ॲप ॲन्डड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे चार प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत कि असुरक्षित हे या ॲपमध्ये कळते. तसेच देशातील कोरानाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या ॲपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप त्वरीत डाऊनलोड करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.
coronavirus : यवतमाळमधील आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:21 PM