यवतमाळ - प्रत्यक्ष लढाई करणे शक्य नाही, त्यांनी सैनिकांना रसद पोचवावी, तीही देशभक्तीच आहे... हाच मंत्र कोरोना युद्धातही अनेकांनी अंगीकारला. त्यातलेच एक आहेत, प्रफुल्ल वसंतराव सूर्यतळ!काय करतात ते? २४ तास पहारा देणा-या पोलिसांना ते जागच्या जागी चहा पाजतात. चहाही असा तसा नाही... रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा! पण चहा पाजतो म्हणजे हा काही ऐरागैरा नथ्थु खैरा आहे, असेही मानण्याचे कारण नाही. चांगल्या फार्मासिटीकल कंपनीत बिझनेस एक्झीकेटिव्ह म्हनून उत्तम नोकरी आहे. तर त्यांची पत्नी उज्ज्वला वाहूरवाघ सूर्यतळ याही ग्रामीण पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत.मग त्यांना का वाटावासा वाटला चहा?..त्यांना तसे वाटण्याचे कारण आहे त्यांच्या मनात दडलेली समाजशील भावना. कोरोनामुळे यवतमाळात मार्चमध्ये लॉकडाऊन झाले. पोलिसांच्या चौका-चौकात ड्युट्या लागल्या. तासन्तास ते एका ठिकाणी पहारा देत उभे. तहान-भूक विस्मरून लोकांना कोरोनामुक्त ठेवण्याचा त्यांचा आटापिटा त्यांनाही थकवून टाकत होता. अशावेळी तेही विषाणूचा बळी ठरण्याची शक्यता होती. म्हणून लॉकडाऊनच्या काळात घरीच असलेले प्रफुल्ल सूर्यतळ या पोलिसांना जागच्या जागी चहा पोहचवू लागले. ते दररोज स्वखर्चाने ८० ते ९० कप चहा स्वत: बनवून स्वत:च्या गाडीने शहरात फिरून पोलिसांना वाटतात. स्वत:च्या हाताने प्रेमाने कप भरून देतात. कप देताना हातांचा स्पर्श होणार नाही, याची आवर्जुन काळजीही घेतात. आर्णी नाका, वडगाव शोरूम चौक, दाते कॉलेज चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक, सीआरओ, ट्रॅफिक ब्रँच हेडक्वार्टर, जूजू चौक, जिल्हा कारागृहापुढील परिसर, वडगाव पोलीस स्टेशन असे जेथे-जेथे पोलिसांचे पॉर्इंट असतात, तेथे-तेथे जाऊन सूर्यतळ पोलिसांना चहा देतात. मार्च महिन्यात सुरू केलेला हा उपक्रम आजही अव्याहत सुरू आहे. यात त्यांचे दरदिवशी साधारण तीन-चारशे रुपये खर्च होत असतील. पण त्यांना विचारले तर म्हणाले, ‘मी खर्च मोजलाच नाही भाऊ!’असा आहे आरोग्यवर्धक चहासूर्यतळ म्हणतात, हा ब्लॅक लेमन टी आहे. यात मिरे, लवंग, सुंठ, तुळशीची पाने, हळद आणि लिंबू वापरले जाते. त्यातून क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. त्याने गळाही मोकळा होतो. डॉक्टरांच्या मते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व्हीटॅमिन सी गरजेचे आहे. या चहाचे आता पोलीसही चाहते झाले आहेत. प्रफुल्ल सूर्यतळ यांच्या उपक्रमाची खबर खुद्द पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यापर्यंतही आता पोहोचली आहे.पत्नीची सूचना सर आंखोंपर!प्रफुल्ल सूर्यतळ यांच्या पत्नी उज्ज्वला वाहूरवाघ-सूर्यतळ या ग्रामीण पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत. त्यांना पोलिसांच्या ड्युटीतील कष्टाची पुरेपूर कल्पना आहे. एका प्रफुल्ल यांनी दाते कॉलेज परिसरातील एका दवाखान्यात नातेवाईकासाठी चहा घेऊन गेले, त्याच चौकात पोलिसांची ड्युटी होती. त्यांनाही चहा द्यायलाच पाहिजे, असे उज्ज्वला यांनी सांगितले अन् तेथूनच सुरू झाला पोलिसांना चहाची रसद पुरविण्याचा सिलसिला. उमरसरा रोडवरील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील सूर्यतळ यांच्या फ्लॅटमधून शहरभर चहा फिरू लागला. मग काही लोक जुळत गेले. वाघापुरातील त्यांचा मित्र महेश बगाडे त्यांच्यासोबत फिरत पोलीस ठाण्यात कधी कधी निर्जंतुकीकरण फवारणी करायचा. तर डॉ. अरुण जनबंधू, डॉ. प्रशांत तामगाडगे, नरेश कोटेचा यांनीही मदत केल्याचे सूर्यतळ सांगतात.
coronavirus: कोरोना योद्ध्यांना रसद पुरविणारा आगळा सैनिक, पोलिसांना देतात रोज चहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 8:48 PM