रूपेश उत्तरवारयवतमाळ : कोरोनामुळे सध्या विवाह सोहळ्यांवर गदा येत आहे. अनेक विवाह रद्द करावे लागत आहे. असाच एक विवाह यवतमाळात दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. आता तिस-यांदाही लग्नाची तारीख पुढे लोटली जाऊ नये, म्हणून चक्क नववधूच स्वत: स्कूटर चालवित वरमंडपी पोहोचली आणि लग्नही लावून घेतले.सुकेश्नी कृष्णराव दडांजे असे या धाडसी तरुणीचे नाव आहे. बाभूळगाव तालुक्यातील अंतरगाव येथील प्रवीण भानारकर या तरुणाशी तिचा विवाह ठरला होता. मात्र कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढे-पुढे ढकलली जात होती. आधी ९ मार्च हा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. नंतर कोरोनाच्या दहशतीमुळे ३१ मार्च ही लग्नाची तारीख ठरविण्यात आली. त्यानंतरही लॉकडाऊन वाढल्याने त्यांना ३१ मार्चच्या विवाहालाही परवानगी मिळाली नाही. लग्नासाठी वाहन पासही मिळाला नाही. अशा स्थितीत दोन वेळा पुढे गेलेले लग्न तिस-यांदा पुढे नेणे योग्य नाही, असा विचार करून मुलीने थेट अंतरगाव गाठण्याचा निर्णय घेतला.२ एप्रिलला सुकेश्नी स्कूटरने एकटीच अंतरगावात पोहोचली. संचारबंदीत फिरण्याची परवानगी नसल्याने सुकेश्नीला असे पाऊल उचलावे लागले. तत्पूर्वी वरपित्याला तशी सूचनाही देण्यात आली होती. वेळेनुसार ठराविक व्यक्तीच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.धाडसाचे कौतुकसुकेश्नीला वडील नाही. आई गृहिणी आहे. सुकेश्नीने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तर मुलगा प्रवीण भानारकर हा वेल्डिंग वर्कशॉप चालवतो. सुकेश्नीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
CoronaVirus: लॉकडाऊनमध्ये नववधू स्कूटरने पोहोचली मंडपात अन् झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 8:56 PM