संतोष कुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सारे काही सुरळीत सुरू असताना त्यांना अचानक कोरोनाची बाधा झाली. वय ८७, सोबतच मधुमेहाचाही आजार, कोरोना संसर्गाचा स्कोअर १६ वर पोहोचलेला, ऑक्सिजनदेखील ८७ पर्यंत खाली उतरलेले होते. त्यामुळे कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. मात्र या आजोबांनी तब्बल ११ दिवस नागपुरातील खासगी रुग्णालयात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा देत त्याला चारी मुंड्या चीत केले. आता हे आजोबा ठणठणीत होऊन आपल्या स्वगृृही परतले आहेत.
ओमप्रकाश करमनारायण खुराणा असे या आजोबांचे नाव. वणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा यांचे ते वडील होते. २७ एप्रिलला ओमप्रकाश खुराणा यांना प्रचंड अशक्तपणासोबतच ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे जाणवत असल्याने घरच्या मंडळींना थोडी शंका आली. त्यामुळे लगेच त्यांची कोरोना चाचणी करून त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले. ३० एप्रिलला चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कुटुंब तणावाखाली आले. परंतु या परिस्थितीतही ओमप्रकाश खुराणा हे सकारात्मक होते.
१ मे रोजी सीटीस्कॅन केले तेव्हा त्यांचा स्कोअर १६ होता. डॉक्टरांच्या मते ते डेंजर झोनमध्ये होते. येथील खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच त्यांना तातडीने त्याच दिवशी रात्री नागपूर येथे हलविण्यात आले. तेथील एका सर्व सुविधायुक्त रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झालेत. तब्बल ९ दिवस ते ऑक्सिजनवर होते. या काळात त्यांनी आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेऊन कोरोनावर यशस्वी मात केली. त्यांनतर ११ मे रोजी ठणठणीत बरे झाल्यांनतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
एकीकडे कोरोनामुळे अनेकांचे बळी जात आहेत. त्यात तरूणांचा समावेश अधिक आहे. असे असताना ओमप्रकाश खुराणा यांनी अगदी धैर्याने कोरोनाचा सामना केला. विशेष म्हणजे, संसर्गाचा स्कोअर १६ वर पोहोचला असतानाही, मी घरीच उपचार घेऊन बरा होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला होता. मात्र कुटुंबियाने रुग्णालयात उपचाराचा निर्णय घेतला.
नियमित व्यायाम आणि सकस आहारओमप्रकाश खुराणा यांना मधुमेहाचा आजार आहे. मात्र ते कधीच थकत नाहीत. सकाळी पाच वाजता उठून किमान एक तास व्यायाम करणे, पायदळ चालणे, सायकलिंग करणे, त्यानंतर गरम पाणी पिणे, नियमित गरम पाण्याचा वाफारा घेणे या बाबी ते कटाक्षाने पाळतात. व्यायाम झाल्यानंतर स्नान आटोपून ते सकाळी दुचाकीने पत्नीसह मुकुटबन मार्गावरील संतधाम येथे दर्शनासाठी जातात. तेथे पूजा, आरती करून नंतर ते घरी परततात. सकारात्मक दृष्टिकोनासोबतच जीवनात शिस्त पाळली तर कितीही मोठ्या आजाराला कोणत्याही वयात आपण पराभूत करू शकतो, हेच ओमप्रकाश खुराणा यांनी दाखवून दिले आहे.