लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात २०४० गावे आहेत. यातील १७०० गावांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाला वेशीवरच रोखले होते. दुसऱ्या लाटेत प्रत्येक गाव कोरोनाच्या शिरकावाने धास्तावले आहे. ज्या ज्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कॅम्प लागत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ५० हजारांच्यावर पोहोचली आहे. ११०० च्यावर मृत्यूची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत गाव सुरक्षित असल्याचा अतिआत्मविश्वास गावकऱ्यांनाच भारी पडला आहे. कोरोना हा आजारच नाही, असे अनेकजण आजपर्यंत मानत आले. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांना झालेली वेदना पाहता आता या आजारापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. मात्र, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कोरोना नियमावलीचे पालन गावपातळीवर होत नाही. काही गावांमध्ये परिस्थिती चांगली आहे, तर काही गावांमध्ये अजूनही तपासणी मोहीम राबविली गेलेली नाही.
आमच्या गावामध्ये ९३ च्या जवळ रुग्ण होते. सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आणि कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला. आता सर्व काही बंद झाले आहे.
- दिलीप अवचट, सरपंच, जांभोरा
सर्दी, खोकला, अंगदुखी याचे सर्रास रुग्ण होते. अजूनही आजाराचे प्रमाण दिसत आहे. आरोग्य विभागाने तपासणी करून रुग्णसंख्या कमी केली आहे.
- गोदाबाई केराम,
सरपंच रुई
संपूर्ण गाव कोरोना नियमावलीचे पालन करीत आहे. यामुळे आजपर्यंत तरी गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. उद्याला गावात कॅम्प लागणार आहे.
- शीतल शेलकर,
सरपंच, गाजीपूर
कोरोना पोहोचण्याची अशी आहेत कारणे
- गावखेड्यातून शहरात जाणारी मंडळी रोजगाराच्या शोधात दररोज अथवा आठवड्यातून एक वेळेस गावात येतात.
- वाढलेला आजार अंगावर काढणे हे प्रमुख कारण कोरोना वाढण्यासाठी घातक ठरले आहे.
- कोरोना आजारच नाही, हे काही तरी भलतेच आहे, या गैरसमजातून रुग्ण वाढले.
- कोरोना नियमाचे पालन न करणे, लग्न समारंभाचे प्रमाण वाढणे या बाबी कारणीभूत आहेत.