लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेले दोन दिवस किंचित दिलासा देणाऱ्या कोरोनाने शुक्रवारी पुन्हा उचल खालली. शुक्रवारी ९५० जण कोरोनामुक्त झालेले असतानाच तब्बल १३३० जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. तर दिवसभरात आणखी २३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
शुक्रवारच्या २४ मृत्यूपैकी ११ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले, ९ खासगी कोविड रुग्णालयात तर तिघांचा मृत्यू डीसीएचसीमध्ये झाला. २४ जणांपैकी चार मृत हे जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ५९ वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला, नेर तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ७० वर्षीय महिला, वणी तालुक्यातील ३८ वर्षीय पुरुष, बाभूळगाव तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष व ६१ वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील ५० व ५८ वर्षीय महिला, नागपूर येथील ५० वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील ३५ वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये झरीजामणी तालुक्यातील ७० वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील ६५ वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष आहे. तर खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ५८, ४२, ६१ वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिला, मारेगाव येथील ७० वर्षीय महिला, पुसद येथील ६५ वर्षीय पुरुष, महागाव येथील ५० वर्षीय पुरुष, आंध्र प्रदेश येथील ५३ वर्षीय महिला आणि वर्धा येथील ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या १३३० जणांमध्ये ८२८ पुरुष आणि ५०२ महिला आहेत. यात पुसद येथील २१४, वणी १९८, दिग्रस १४५, यवतमाळ १२०, मारेगाव ११२, दारव्हा ११०, बाभूळगाव ७८, नेर ७६, उमरखेड ६२, पांढरकवडा ५२, आर्णी ४४, राळेगाव २६, महागाव २५, घाटंजी २०, कळंब १६, झरीजामणी १२ आणि इतर शहरातील २० रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत ४ लाख ६३ हजार ६२३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ४ लाख ६१ हजार ७ अहवाल प्राप्त तर २६१६ अप्राप्त आहेत. तसेच ४ लाख ४३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह सात हजारांवर
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ८६७९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७३४९ अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२९४ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी २६७४ रुग्णालयात भरती आहेत. तर ४६२० जण गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० हजार ९६४ इतकी झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या ५२ हजार २३२ आहे. तर जिल्ह्यात एकूण १४३८ जणांचे मृत्यू झाले. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १३.१५ असून मृत्यूदर २.३६ इतका आहे.