लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात त्रिस्तरीय उपचार पद्धतीची व्यवस्था केली आहे. मध्यम, गंभीर व अतिगंभीर अशा रुग्णांची त्या-त्या वाॅर्डांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. आयसीयू व्यतिरिक्त सारी व आयसोलेशन वाॅर्डातील मृत्यूची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही. संपूर्ण कोविड रुग्णालयातील एकूण डाटा ठेवला जात आहे. त्यामुळे आयसीयू सुविधेअभावी किती जणांचा मृत्यू झाला हे भयाण वास्तव पुढे येताना दिसत नाही.
शासकीय कोविड रुग्णालयात १ मार्च ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ४०३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये १६ जणांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते. नंतर मृत्यूचे तांडव सुरू झाले. १ मार्च ते ४ मे या ६५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ७२४ जणांचा मृत्यू झाला. यात ४३ जण मृतावस्थेत आले होते. त्यांना कुठेही उपचार सुविधा मिळाली नसल्याने जीव गमवावा लागला.
बेडच्या प्रतीक्षेत मृत्यू
फिवर ओपीडीसमोर बेड उपलब्ध होईल या प्रतीक्षेत असलेल्या गंभीर रुग्णांचा कित्येकदा मृत्यू होतो. तरी त्याला दाखल करून घेण्यास असमर्थता असते. रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याच्या घटनाही येथील कोविड रुग्णालयात घडल्या आहेत.
कॅज्युअटीमधील मृत्यूला जबाबदार कोण
शासकीय कोविड रुग्णालयातील ५७७ खाटा गेल्या अनेक महिन्यांपासून फुल्ल आहेत. रुग्णाला सुटी झाली किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तरच नव्या रुग्णाला दाखल करून घेतले जाते. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णाची फिवर ओपीडीमध्ये तपासणी होते. त्याला ऑक्सिजनची गरज भासल्यास तात्पुरत्या स्वरूपात अपघात कक्षात भरती केले जाते. मात्र, येथे त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याच्यावर आयसीयू उपचाराची सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अपघात कक्षात होणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातत्याने गंभीर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. १७ वाॅर्डमध्ये केवळ कोविड व कोविडसदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटर्स व इतर साधनेसुद्धा कमी पडत आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर निश्चितच ताण आला आहे. नागरिकांनी वेळेत येणे गरजेचे आहे.
- डाॅ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय