देवेंद्र पोल्हेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवनवीन शोध लावत अवकाशात भरारी घेणाऱ्या मानवाला कोरोना महामारीने हैराण केले असले तरी मागास, अशिक्षित म्हणून गणल्या जाणाऱ्या कोलाम समाजाने स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत कोरोना महामारीला कोलाम पोडाबाहेर ठेवण्यात यश मिळविले आहे. शक्तिवर्धक रानमेवा आणि आजारावर गुणकारी झाडमुळी या दोन गोष्टीही कोरोना रोखण्यास फायदेशीर ठरल्या आहेत.कोरोना महामारीला रोखायचे असेल, तर फिजिकल डिस्टन्स आणि स्वच्छता या दोन गोष्टी पाळण्याचा सल्ला सारे जग देत आहे. सर्व दृष्ट्या प्रगत असलेल्या महानगरात कोरोनाचे थैमान सुरू असून, अनेक जण प्राण गमावित आहेत. गेल्या दीड वर्षांत कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना, हा कोरोना डोंगरदऱ्यात वसलेल्या कोलाम वस्तीत का पोहोचला नाही, याचा कानोसा घेण्यासाठी तालुक्यातील जानकाई पोड, शिव पोड, बिहाडी पोड, लाईन पोड, कुंभी पोड,सोनू पोड आदी कोलाम वस्त्यांना भेट देऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून या वस्त्यात कुठेही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तालुक्यात सर्वत्र तापाची साथ सुरू असताना, पोड वस्तीवर मात्र आजाराचे कोणतेही थैमान नाही. याबाबत बोलताना जानकाई पोड येथील बंडू आलम म्हणाले, आम्ही स्वच्छता पाळतो. गावात कुठेही सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही, तर प्रत्येक घरी शोषखड्डे आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत नाही. प्रत्येक घराच्या भिंती सारवून स्वच्छ आहेत. घर व अंगण दररोज शेण-मातीने सारवून निजंर्तुक केले जाते. महिन्यातून एकदा धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येते. गाव बांधणी व इतर कार्यक्रमाच्या वेळी गावापासूनचा एक कि.मी.चा परिसर झाडून स्वच्छ केला जातो. आम्ही आमच्या गावात बाहेरील लोकांना प्रवेश करू देत नाही आणि आमच्या गावचे नागरिक बाहेरगावी मुक्कामाला राहत नाहीत. मुळात पोडावरील घरे दूर-दूर असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम आपसूकच पाळले जातात. याचमुळे रोगराईपासून या वस्त्या दूर आहेत.
आहारात रानभाज्यांचा केला जातो वापरआहारात रानभाज्या, कंदमुळे यांचा वापर जास्त असून, ज्वारी-बाजरीच्या भाकरी जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. सोबतच जंगलातील डिंक भाजून खाणे, मध, रानफळ आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. कोलाम समाजाचा गावदेवीवर मोठा विश्वास असून, दरमहा देवीजवळ उत्सव साजरा केला जातो. तीच आमच्या जिवाचे रक्षण करते, अशी त्यांची श्रद्धा आहे. आजारापासून बचाव करण्यासाठी विविध झाडांचा रस काढून त्याचा काढा बनवून हे लोक पीत असतात. त्या झाडांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.