- अविनाश साबापुरेयवतमाळ : मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये ‘ल’ असे वापरले जाते. इंग्रजीची ही भाषिक गरिबी मराठीचे भाषासौष्ठव गेल्या कित्येक वर्षांपासून बिघडवत आहे. मात्र, आता ‘ळ’ या व्यंजनाचा उच्चार इंग्रजीतही ‘ळ’ असाच व्हावा, यासाठी यवतमाळ येथील एका डॉक्टरने सखोल संशोधन केले आहे. त्यामुळे आता इंग्रजी भाषेतही यवतमाळ, पुरणपोळी, माळी, टाळी, असे मराठी शब्द अचूक लिहिण्याची आणि उच्चारण्याची सोय झाली आहे.
डॉ. राजू श्यामराव रामेकर असे या डॉक्टरांचे नाव आहे. मातृभाषेविषयी प्रचंड अभिमान बाळगणारे डाॅ. रामेकर यांनी इंग्रजीमध्ये होणारी मराठीची मोडतोड थांबविण्याचा चंग बांधला. ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये ‘ळ’ असेच लिहावे यावर संशोधन केले. त्याला नुकताच भारत सरकारकडून कॉपीराइट मिळाला आहे. मराठीसह तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्येही ‘ळ’ हे व्यंजन महत्त्वपूर्ण आहे. मात्र, या भाषेतील अनेक शब्द इंग्रजीमध्ये अनुवादित करताना किंवा उच्चारताना ‘ळ’ऐवजी ‘ल’ वापरला जातो. त्यातून मूळ भाषेचे सौंदर्य डागाळते. मात्र, आता डॉ. रामेकर यांच्या संशोधनानंतर इंग्रजी भाषेत ‘ळ’ लिहिता-वाचता-बोलता येणार असल्याने या सर्व भाषांचा सन्मान राखणे शक्य होणार आहे.
इंग्रजीत असा लिहावा ‘ळ’
इंटरनॅशनल अल्फाबेट ऑफ संस्कृत ट्रान्सलिटरेशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार इंग्रजी भाषेत ‘ळ’ कसा लिहावा, यावर डॉ. रामेकर यांनी दिलेला पर्याय असा - इंग्रजीमध्ये ‘ळ’ लिहिताना ‘एल’ लिहून त्याच्या खाली आडवी रेषा काढावी. अधोरेखित केलेल्या या ‘एल’चा उच्चार ‘ळ’ असा करावा. (मराठी ‘ळ’ : इंग्रजी ‘L’).
अनेक कागदपत्रांत घोळ
‘ळ’चा उच्चार इंग्रजीत करता येत नसल्याने जातीचे दाखले, टीसीवरील अनेकांचे नाव चुकले आहे.
का केले संशोधन?
मूळ यवतमाळचे डॉ. राजू रामेकर तेलंगणातील आदिलाबाद येथे स्थायिक झाले आहेत. त्यांना अनेकदा इंग्रजीतून व्यवहार करावा लागतो. त्यावेळी ‘ळ’चा उच्चार किंवा लेखन चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यवतमाळचा उच्चार यवतमाल, यवतमेल असा होेणे त्यांना खटकू लागले. त्यातूनच त्यांनी हे संशोधन सुरू केले.
प्रत्येक मराठी शब्दाची, मराठी नावाची, मराठी गावाची आणि वस्तूची मूळ ओळख कायम राहावी यासाठी हे संशोधन करून कॉपीराइट केले. आता इंग्रजीत ‘ळ’ लिहिता येणारे हे डिझाइन वापरण्यासाठी की-बाेर्ड, टाइपरायटरमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत सरकारने अधिसूचना काढावी. - डॉ. राजू रामेकर, संशोधक, आदिलाबाद