जिल्हा परिषद टॉपवर : दरमहा सरासरी सात अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई यवतमाळ : प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड पसरतच चालली आहे. विविध प्रकरणांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आलेख वाढत आहे. मागील वर्षभरात विविध विभागातील ७५ पेक्षा अधिक जणांवर विविध स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद टॉपवर आहे. त्या खालोखाल पोलीस विभागाचा क्रमांक लागतो. जिल्हा परिषद, पोलीस, महसूल, वीज, कृषी, शिक्षण, वन, भूमिअभिलेख या इतर लोकांशी प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या विभागात कामांसाठी अडवणूक ही बाब नवीन नाही. यातून त्रस्त नागरिकांच्या तक्रारीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच मुद्रांकशुल्क अपहार प्रकरणात सात ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले. प्रेमप्रकरणाच्या तपासात कसूर केल्याचा ठपका ठेवत महागाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ निलंबित झाले. उमरखेड ठाणेदाराकडे घरफोडी झाली. या प्रकरणात चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आरोपी पळाल्याने जमादारासह चौघे निलंबित झाले. फेब्रुवारीत साखर घोटाळ््यात निवृत्त तहसीलदार सुरेश थोरातवर गुन्हा नोंदविला. महिला पोलिसाची पर्स चोरणाऱ्या सहकारी महिलेला अटक झाली. मार्चमध्ये तलाठी बोंबले, विलास महाजन, तालुका कृषी अधिकारी राऊत, घुले, कांबळे यांच्यावर कारवाई झाली. पाटणचे ठाणेदार शिवाजी अहीरे आणि मुख्याध्यापक बल्लाळ एसीबीच्या जाळ््यात अडकले. वनपाल गौतम पुनवटकर आणि सहकाऱ्यांना लाच घेताना अटक केली. एप्रिलमध्ये कारेगाव (वडकी) येथे मजूर मृत्यू प्रकरणी ग्रामसेवकासह सात जणांवर गुन्हा नोंदविला. झरी भूमिअभिलेखचा भूमापक राजू राठोड आणि अन्न निरीक्षक प्रभाकर काळे एसीबीच्या जाळ््यात अडकले. जूनमध्ये कृषी पर्यवेक्षक एसबी महल्ले, सहायक एस.डी. गुल्हाने, शाखा अभियंता रमेश कोरटी, विस्तार अधिकारी सुरेश निकम, नायब तहसीलदार डी.जी. रामटेके, लिपिक एस.पी. भगत, तलाठी एम.डब्ल्यू. भगत यांच्यावर कारवाई झाली. यावलीचे पोलीस पाटील विरेंद्र राठोड खून प्रकरणात जमादार रवींद्र गिमोनकर निलंबित झाले. अपहाराच्या आरोपात डाकपाल राजेश देशमुखवर गुन्हा दाखल झाला. चिमणापूर येथे कामात अनियमितता प्रकरणी अभियंता महेंद्र गायकवाड, ग्रामसेवक गजानन टाके यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आॅगस्टमध्ये ग्रामसेवक विठ्ठल डवरे यांना लाच घेताना पकडले. खासगी व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी लाईनमन अब्दुल रहमान अब्दुल सत्तार यांना शिक्षा झाली. सप्टेंबरमध्ये ग्रामसेवक गणेश सुगदे, तलाठी एन.टी. राठोड, दिलीप गुप्ता, दुकान निरीक्षक विवेक हेडाऊ, शेतकरी मृत्यू प्रकरणी रमेश बंजे हे कारवाईत अडकले. आॅक्टोबरमध्ये विशेष लेखा परीक्षक आर.आर. शेकोकार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. नोंव्हेंबरमध्ये वडकी ठाण्याचे हवालदार अण्णा उईके यांना लाच मागितल्याच्या आरोपात अटक झाली. वीज अभियंता अल्केश अग्रवाल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर कांबळे यांना लाच स्वीकारताना पकडले. (वार्ताहर)
भ्रष्टाचाराने बरबटलेले हात कारवाईत अडकले
By admin | Published: December 31, 2015 2:46 AM