मंगेश चवरडोल किन्ही (जवादे) कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत. विविध कारणे पुढे करून क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये कमी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार, लोणबले, यंगारे हे वाढोणा बाजार येथील विमल अॅग्रो जिनिंगमध्ये कापूस विकण्यासाठी गेले होते. त्यांच्या कापसाला चार हजार ६०० ते चार हजार ९०० रुपये दर दिला जाईल, असे सांगण्यात आले. कापसावर पाणी मारून आहे, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्ष कापसाचा दर पाच हजार ६०० ते पाच हजार ८०० रुपये आहे. शेवटी या शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देऊन परत पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या कापसावर पाणी मारले असल्याचा आरोप केला जातो. दुसरीकडे याच जिनिंगमध्ये मोटर लावून कापसावर पाणी मारले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. सदर प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार यांनी आपल्या कापसाला चार हजार ८०० रुपये दर दिल्याचे सांगितले. कापसू पाण्याचा असल्याचा आरोप करण्यात आल्याचे ते म्हणाले.
वाढोणा येथे कापूस व्यापाऱ्यांची मनमानी
By admin | Published: April 01, 2017 12:35 AM