केवळ सोपस्कार : शिक्षकांच्या प्रश्नांचा पाऊसलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी थेट गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षकांची सहविचार सभा जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. सहविचार स्वरुपाची सभा असली, तरी प्रश्नांच्या भडीमारामुळे या सभेला जनता दरबाराचे रूप आले होते. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातील त्रुटीचा मुद्दा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने उचलून धरला. मागील वर्षी अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांचे वेतन काही महिन्यांपासून अदा करण्यात आलेले नाही. मात्र १९८५ च्या सेवाशर्ती नियमावलीनुसार, अशा शिक्षकांना जुन्या आस्थापनेतून वेतन देणे बंधनकारक आहे. पांढरकवडा येथील विश्वंभर राऊत यांचे समायोजन जळका येथील राणी लक्ष्मीबाई विद्यालयात झाले. मात्र अद्यापही आपले वेतन झालेले नाही, अशी आपबिती त्यांनी मांडली. त्यावर राज्यमंत्र्यांनी जाब विचारताच शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी हा धोरणात्मक विषय असल्याचे लक्षात आणून अशाच प्रकारे आणखी १६-१७ जणांचे वेतन थांबल्याची माहिती दिली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, संचमान्यता दुरुस्ती, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, संचमान्यता दुरुस्ती, पोषण आहार, वेतन १ तारखेलाच द्या, प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या अशा मुद्यांवर शिक्षकांनी वैयक्तिक समस्यांचा भडीमार केला. त्यावर ना. रणजित पाटील यांनी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक राठोड यांच्याकडून उत्तरे वदवून घेतली. मात्र, नियमांच्या चौकटीत दिलेल्या उत्तरांनी समाधान न झाल्याने शिक्षक प्रचंड भडकले. दुपारी ३ वाजता संपणारा दरबार चक्क सायंकाळी ६ पर्यंत गाजला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, शिक्षण उपसंचालक राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते.
राज्यमंत्र्यांच्या दरबारात ‘शिक्षण’चे धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 2:21 AM