नीलिमा टाके : व्यवसाय मार्गदर्शन परिषद दिग्रस : वाढत्या स्पर्धा व योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने अनेक मुले मागे पडतात. त्यात दुर्दैवाने हुशार विद्यार्थ्यांचादेखील समावेश असतो. मात्र समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणे शक्य असून यशाच्या दारापर्यंत पोहोचता येते, असे प्रतिपादन अमरावती विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी नीलिमा टाके यांनी केले. दिग्रस येथील अंजूमन उर्दू विद्यालयात सोमवारी आयोजित व्यवसाय मार्गदर्शन परिषदेत त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य हाजी एजाजोद्दीन होते. प्रमुख पाहुणे म्हणून समुपदेशक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष किशोर बनारसे उपस्थित होते. टाके म्हणाल्या, लाखो विद्यार्थ्यांची कल चाचणी करणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शासन व विशेष करून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अभिनव संकल्पनेमुळे विद्यार्थी व पालकांना नवी दिशा मिळाली आहे. यावेळी आयोजित प्रश्नोत्तराच्या सत्रात विविध शंकांचे निरसन करण्यात आले. शाळेतर्फे नीलिमा टाके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मजहर अहमद खान, प्रा.सैयद मोहसीन, प्रा.मोहमद शफीक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणे शक्य
By admin | Published: July 21, 2016 12:22 AM