यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ४ या वेळात जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमीत बाजोरिया यांच्यात ही थेट लढत होत आहे.
दरम्यान, गुरुवारी महाविकास आघाडीने आपल्या सर्व मतदारांना नागपूरच्या अमरावती रोडवरील चोकरधानी येथे बोलविले. तिथे सायंकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या मतदारांची शिरगणती घेण्यात आली. उपस्थितांचा हा आकडा ३१७ वर पोहोचल्याचा दावा शिवसेनेकडून सोशल मीडियावर केला जात आहे. याशिवाय आणखी १५ ते २० मतदार पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. त्याचेवळी भाजपने आपले १६२ मतदार सहलीला गेल्याचे म्हटले आहे. या दोन्हीची एकूण बेरीज अधिकृत मतदारसंख्येपेक्षा (४८९) अधिक होत असल्याने नेमका कुणाचा दावा खरा याबाबत संभ्रम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रतीक्षेत महाविकास आघाडीचे मतदार दिवसभर नागपुरात ताटकळत होते. अखेर सायंकाळी एकनाथ शिंदे आल्यानंतर शिरगणती पार पडली. यावेळी वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, अॅड.शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
भाजपच्या काही मतदारांना नागपुरात ठेवले जाणार असून बहुतांश मतदारांना यवतमाळातील हॉटेलमध्ये आणले जाणार आहे. सकाळी त्यांना भाजप कार्यालयात बोलविण्यात आले असून तेथूनच त्यांना मतदानाला नेले जाणार आहे.